नगर : काही कोविड सेंटरमध्ये भरती केलेल्या रुग्णांमध्ये रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही, मानसिक स्थिती घाबरलेल्या रुग्णांचे प्रबोधन होत नाही अशा अनेक अडचणींचे फोन मला येत आहेत. त्यामुळे ज्या लोकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांना कोणतेच आजाराचे लक्षणे विशेष नाहीत, त्यांना रुग्णालयात थांबविणे उचित वाटत नाही. सरकारने त्यांना होम क्वारंटाईन करून योग्य ती औषधे द्यावीत. असे मत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले.
कर्डिले राहत असलेल्या बुऱ्हाणनगर येथे रोज रुग्ण आढळून येत आहेत. त्याबाबत बोलताना त्यांनी बाधितांच्या समस्यांवर भाष्य केले. `सरकारनामा`शी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रोज शंभर ती दोनशेपेक्षाही जास्त रुग्ण सापडू लागले आहेत. अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे कुटुंब घाबरून जाते. एखाद्या कुटुंबात एक कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण कुटुंबाची तपासणी केली जाते. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचेही स्वॅब घेतले जातात. ते आवश्यकही आहे. परंतु त्यामध्ये बाधित आढळून आलेले बहुतेक लोकांमध्ये कोणतेही लक्षणे नसतात. केवळ अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात येते. त्यातील अनेक रुग्ण घाबरून जातात. त्यामुळे त्यांची शुगर, बीपी वाढत असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत विनाकारण त्यांची फरफट होते. त्यामुळे अशा रुग्णांना घरीच क्वारंटाईन करून उपचार दिल्यास प्रशासनावर ताण येणार नाही, शिवाय घरी त्यांची काळजी व्यवस्थित घेतलीही जाईल. त्यामुळे सरकारने अशा लोकांच्याबाबतीत तातडीने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यात काही दिवस संपूर्ण लाॅकडाऊन आवश्यक
सध्या एखाद्या गावात एक जरी रुग्ण आढळला तर संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येते. ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने हे करतात. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य त्याबाबत नियोजन करतात. काही दिवसांसाठी व्यवहार ठप्प होतो. ग्रामपंचायतींना असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तर जिल्ह्याला का दिला जात नाही. जिल्ह्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लाॅकडाऊन करून कोरोनाला नियंत्रित करायला हवे, असे मत कर्डिले यांनी व्यक्त केले.
खासगी रुग्णालयांपेक्षा कोविड सेंटर बरे
कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने भरती झालेल्या रुग्ण अनुभव सांगतात. विशेष लक्षणे नसलेले कोविड सेंटरमध्ये राहिलेल्या रुग्णांना जेवण, औषधे आदी सर्व उपचार मोफत मिळतो. शिवाय सात दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना लगेचच सोडून दिले जाते. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र राज आठ-नऊ हजार रुपयांच्या बिलाचे मिटर सुरू होते. शिवाय अनेक अनावश्यक औषधांचे डोस दिले जातात. त्यामुळे चांगला रुग्णही तेथे घाबरून जातो. शिवाय 12 ते 14 दिवस संबंधित रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी मिळत नाही. काही ना काही कारणांनी त्याच्यावर उपचार सुरूच असतात, अशा तक्रारी रुग्णांकडून होत असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरही सरकारचे चांगले नियंत्रण हवे.
बुऱ्हाणनगर लवकर कोरोनामुक्त करू
बुऱ्हानगर येथे कोरोना रुग्ण वाढत असले, तरी तेथील बहुतेक लोक नगर शहरात नोकरीस आहेत. त्यामुळे शहरातून हा कोरोना गावात घुसला आहे. शिवाय गावाची बरीचशी हद्द नगर शहराच्या भागाजवळ आहे. काही भाग केवळ नावालाच ग्रामपंचायत हद्दीत आहे. प्रत्यक्षात तो शहराचाच भाग बनला आहे. साहजिकच तेथील रुग्ण संख्याही यामध्ये दिसते. एक रुग्ण सापडल्याबरोबर आम्ही संपूर्ण गाव बंद केले होते. सर्व दुकाने बंद ठेवली होती. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी केवळ 2 तास शिथिल केले जाते. प्रथम सापडलेले रुग्ण आता कोरोनामुक्त होऊन घरीही आले आहेत. त्यामुळे हे गाव लवकरच कोरोनामुक्त होईल, असे कर्डिले यांनी सांगितले.

