प्रस्तापितांना शह देण्यासाठी तिसरा पत्ता ओपण, पिंपळगाव खांडच्या जलपुजनातून `बीजे`रोपण - Opening the third address to give support to the devotees, BJ` planting from Pimpalgaon Khand Jalpujan | Politics Marathi News - Sarkarnama

प्रस्तापितांना शह देण्यासाठी तिसरा पत्ता ओपण, पिंपळगाव खांडच्या जलपुजनातून `बीजे`रोपण

शांताराम काळे
शनिवार, 11 जुलै 2020

तिसऱ्या आघाडीच्या `बीजे`रोपणाचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे यासाठी `बारामती`ची रसद मिळत असल्याचीही तालुक्यात जोरदार चर्चा आहे.

अकोले : `आम्हाला जुने नको, नि नवीन तर नकोच नको,` असे म्हणत यापुढे आम्हीच आमचे नेतृत्व करू, असे तालुक्यातील काही नेत्यांनी ठणकावून सांगत तिसऱ्या आघाडीच्या `बीजे`रोपणाचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे यासाठी `बारामती`ची रसद मिळत असल्याचीही तालुक्यात जोरदार चर्चा आहे. काल पिंपळगाव खांडच्या जलपुजनाच्या निमित्ताने तालुक्यातील पिचड व लहामटे या दोन्ही नेत्यांवर झालेल्या टिकेमुळे हे पत्ते हळूहळू ओपण होऊ लागले आहेत.

पिचडांचे ते कार्यकर्ते कसे दुरावले

ऐके काळी अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या कार्यकाळात विकास कामांचा सपाटा लावला. पाणीदार नेता म्हणून काम केले. आंबित, बलठाण सांगवी, पाडोशी, निळवंडे असे एक ना तर एक डझन लघू, मध्यम, जलाशय उभारले. तर या जलाशयांसाठी विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचेही आदर्श पुनर्वसन केले. वाडीवस्तीवर वीज, दळणवळण सुलभ व्हावे, म्हणून प्रत्येक गावात रस्ते, आश्रमशाळा, वस्तीशाळा आदिवासींचे वेगळे बजेटमधून आदिवासी बिगर आदिवासी भेदभाव न करता सर्वच भागालाही न्याय दिला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच व्यासपीठावरील काही नेत्यांनी पिचड यांच्या पराभवानंतर पाठ फिरविली. 40 वर्षात काय केले, असे म्हणत विरोधकांच्या सुरात सूर मिसळविला. त्या जवळच्याच नेत्यांनी आता पिचड यांची साथ सोडून सवता सुभा करून त्यांना टीकेचे लक्ष्य केले.

जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, अगस्ती कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे या दोघांनीही जलपुजनाच्या कार्यक्रमात पिचड यांच्यावर टीकाश्र सोडले. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गुणगाण गायले. याचा अर्थ काय लावायचा, हे तालुक्याने ओळखून घतले.

आमदार लहामटे यांचे कार्यकर्ते का दुरावले

तालुक्यातील शिवसेनेचे नेते बाजीराव दराडे व मारुती मेंगाळ यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपला म्हणजे पिचड यांना मदत करण्याऐवजी डाॅ. किरण लहामटे यांना मदत केली. परंतु आता मात्र ते लहामटे यांच्यावरच नाराज झाले आहेत. आमदारांनी हवेत नव्हे, तर जमिनीवर राहावे, असे त्यांचे म्हणणे आहे. पिंपळगाव खांडच्या जलपुजनाच्या निमित्ताने या नेत्यांनी आमदारांवर टीकेची झोड उठविली. आणि आपण तिसरा पर्याय शोधत असल्याचे दाखवून दिले.

`बीजे`रोपण झाल्यास अगस्तीला लाभ

अकोले तालुक्याची जनता पिचड यांच्या कामावर नाराज आहे. आमदार लहामटे यांच्याकडूनही कामे होत नाहीत, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व कार्यकर्ते जलपुजनाच्या निमित्ताने एकत्र आले असून, त्यांनी तिसऱ्या आघाडीचे बिगुल वाजविले आहेत. त्यातच परिणाम म्हणून `बीजे`रोपण करण्याचे मनसुबे काहींचे आहे. या फळीला बारामतीची साथ मिळाल्यास तालुक्याच्या विकासासाठी ही फळी आगामी काळात कशी काम करते, याकडे आता धुरिणांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अगस्ती साखर कारखान्याला त्याचा कसा फायदा होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख