ओपीडीत उपचार नाही, थेट ऑपरेशन करणार! प्राजक्‍त तनपुरे यांचा इशारा  - OPD has no treatment, will operate directly! Warning of Prajakrit Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama

ओपीडीत उपचार नाही, थेट ऑपरेशन करणार! प्राजक्‍त तनपुरे यांचा इशारा 

मुरलीधर कराळे
सोमवार, 25 जानेवारी 2021

मागील 20-25 वर्षांत काय झाले, याकडे आपण लक्ष देत नाही. आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. जो माझा नाही, त्याला कसेही करून चिरडून टाकण्याची विकृत्ती यापुढे चालणार नाही.

नगर : "कुणाला किती त्रास झाला आहे, हे नगर तालुक्‍याने पाहिले आहे. त्यांनी त्रास दिल्यानेच, ते माजी झाले, याचे भान त्यांनी ठेवावे. विकासकामे करताना राजकारण करावे; पण ते विकासाच्या मुद्द्यावर करावे. एखाद्याचा संसार उघडा पाडण्यासाठी राजकारण करू नये, अन्यथा ओपीडीत उपचार नाही, तर डायरेक्‍ट ऑपरेशन केले जाईल,'' असा इशारा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. 

तनपुरे यांच्या शेंडी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्धव दुसुंगे होते. जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, अमोल जाधव, रघुनाथ झिने, गोविंद मोकाटे, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, राजेंद्र भगत, रोहिदास कर्डिले आदी उपस्थित होते. 

तनपुरे म्हणाले, "मागील 20-25 वर्षांत काय झाले, याकडे आपण लक्ष देत नाही. आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. जो माझा नाही, त्याला कसेही करून चिरडून टाकण्याची विकृत्ती यापुढे चालणार नाही. ज्यांची घरे काचेची आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारू नये. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत नगर तालुक्‍यासाठी चांगला पर्याय देणार आहोत. जिल्हा बॅंक अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे खरी परिस्थिती जनता ओळखून आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेवरही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल.'' 

राहुरी-नगर मतदारसंघासह जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नुकतीच नगर तालुक्‍यातील डोंगरगण येथे पाहणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. 

हेही वाचा...

राज्यातील प्रमुख ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांची शहरात बैठक 

नगर, ता. 24 ः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख संघटनांची बैठक शहरातील बुरुडगाव रस्ता येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात बैठक झाली. यात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीतर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वाढलेले किमान वेतन, राहणीमान भत्ता, पेन्शन, ग्रॅज्युटी रक्कम आदी प्रश्‍नांवर एकसंघटितपणे आंदोलन केले जाणार आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) चे तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली. या वेळी ऍड. सुधीर टोकेकर, ऍड. सुभाष लांडे, भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, मारुती सावंत, संजय डमाळ, एकनाथ वखरे, अशोक वाघमारे, बबन पाटील उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सरचिटणीसपदी धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सुभाष तुळवे, उपाध्यक्षपदी विनोद देशमुख, मिलिंद गणविरे, सहसचिवपदी सखाराम दुरुगुडे, मंगेश म्हात्रे, श्रीकांत डापसे, खजिनदारपदी ए. बी. कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुखपदी विजय सरोवर, सदस्यपदी तानाजी ठोंबरे, राजेंद्र व्हावळ, राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख