दुध दराबाबत उद्या ऑनलाईन बैठक! योग्य निर्णय न झाल्यास नेते आंदोलनावर ठाम - Online meeting on milk price tomorrow! Leaders insist on agitation if proper decision is not taken | Politics Marathi News - Sarkarnama

दुध दराबाबत उद्या ऑनलाईन बैठक! योग्य निर्णय न झाल्यास नेते आंदोलनावर ठाम

मुरलीधर कराळे
सोमवार, 20 जुलै 2020

प्रारंभी ही बैठक मुंबईला घेण्याचे ठरले होते, तथापि, शेतकरी नेत्यांना तेथे येणे शक्य नसल्याने ही बैठक आता आॅनलाईन घेण्याचा निर्णय झाला आहे.

नगर : दूध दरवाढीबाबत आज सकाळी सुरू झालेल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली असून, उद्या (ता. 21) दुग्ध विकास मंत्रालयाने बैठकिचे नियोजन केले आहे. महाराष्ट्राचे उपसचिव राजेश गाविल यांनी याबाबत सूचना दिली आहे.प्रारंभी ही बैठक मुंबईला घेण्याचे ठरले होते, तथापि, शेतकरी नेत्यांना तेथे येणे शक्य नसल्याने ही बैठक आता आॅनलाईन घेण्याचा निर्णय झाल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे डाॅ. अजित नवले यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

दूध दरवाढीबाबत आज अकोले तालुक्यातून सुरूवात करण्यात आली. हे आंदोलन राज्यभर सुरू झाले. शेतकऱ्यांनी दगडाला दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू केले. त्याची दखल सरकारने घेतली असून, उद्याच दुपारी 2 वाजता मुंबईत बैठकिचे नियोजन केले आहे. दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकिला रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, कार्याध्यक्ष दीपक भोसले, किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे उपस्थित राहणार आहेत. तसेच नगर जिल्ह्यातील राज्य सुकाणू समितीचे पारनेर येथील सदस्य अनिल देठे, अकोले येथील रोहिदास धुमाळ व राहुरी येथील मधुकर म्हसे यांना बैठकिला निमंत्रण देण्यात आले आहे. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईला जाणार नाहीत. ही बैठकच आता आॅनलाईन घेण्याचे नियोजन केले असल्याने हे नेते सहभागी होणार आहेत.

सध्या कोरोनामुळे शेतीमालाला दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. दुग्धोत्पादन हा शेतीला जोड धंदा आहे. कोरोनामुळे दुध विक्रीही घटली असल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय, असा प्रश्न पडला आहे. त्यात दुधाला कमी दर असल्याने आर्थिक गणित जुळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरू केले. त्याचा प्रारंभ अकोले तालुक्यातून करण्यात आला. दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर द्यावा. तसेच प्रतिलिटर 10 रुपये शेतकऱ्यांना अनुदान वर्ग करावे, अशा मागण्या शेतकरी नेत्यांनी केल्या. आज नगर कोल्हापूर, सांगली तसेच इतर जिल्ह्यात आज दिवसभरात आंदोलने झाली. त्यामुळे राज्य सरकारने अखेर बैठकिचे नियोजन केले आहे.

आॅनलाईन बैठकिची लिंक आली : नवले

दुधदरवाढीबाबत उद्या सरकारने आयोजित केलेली ही बैठक आॅनलाईन होणार आहे. मंबईला बैठक घेण्यास आमचा विरोध होता. नगर जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांना निमंत्रण असले, तरी कुणीही जाणार नव्हते. आता आॅनलाईन मिटिंग होणार असल्याने त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असे मत शेतकरी संघर्ष समितीचे डाॅ. अजित नवले यांनी व्यक्त केले.

बैठकिचा फार्स कशासाठी : धुमाळ

सरकारने बैठकिचा फार्स करू नये. परंतु बैठका घेवून सरकार काय साध्य करणार. आमचा अशा बैठकांना विरोधच होता. सरकारने थेट निर्णय घेवून सरसकट दुध उत्पादकांना लिटरमागे 10 रुपये प्रमाणे अनुदान वर्ग करावे, अशी आमची मागणी आहे, असे मत बैठकिला निमंत्रण असलेले अकोले येथील शेतकरी नेते रोहिदास धुमाळ यांनी व्यक्त केले.

नुसतीच बैठक नको, दरवाढ हवी : देठे

मी 13 जुलैला मुख्यमंत्र्यांना दूध दराबाबत पत्र दिले होते. इतके दिवस त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती. आता बैठक घेवून सरकार काय साध्य करणार. आता बैठक नको, दुधाला दरवाढ मिळायला हवी. उद्या आॅनलाईन बैठक होणार असून, त्यात नगर जिल्ह्यातील शेतकरी नेते सहभागी होतील. परंतु योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, असे मत राज्य सुकाणू समितीचे पारनेर येथील सदस्य अनिल देठे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख