पिंपरीत ऑनलाईन निवडणुकीचा ऑफलाईन जल्लोष भोवला ! 70 जणांविरुद्ध गुन्हे - Online election in Pimpri is offline! Crimes against 70 people | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरीत ऑनलाईन निवडणुकीचा ऑफलाईन जल्लोष भोवला ! 70 जणांविरुद्ध गुन्हे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

उपमहापौर नानी तथा हिराबाई घुले यांचे चिरंजीव चेतन हे पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत.

पिंपरीः उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध जिंकल्यानंतर केलेला मोठा जल्लोष पिंपरी-चिंचवडमधील भाजपला भोवला आहे. त्यांच्या उपमहापौरांच्या मुलासह सत्तर जणांविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला.

उपमहापौर नानी तथा हिराबाई घुले यांचे चिरंजीव चेतन हे पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतरही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवित उपममहापौर निवडणूक विजय दणक्यात साजरा केला गेल्याने त्याची मोठी चर्चा झाली होती.

गेल्या महिन्यातच (ता. २२) महापौर माई ढोरे यांनी शहराचे कारभारी, भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मिस अॅन्ड मिसेस पिंपरी-चिंचवड स्पर्धेत कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आले होते.

स्वतः महापौरांनी त्यावेळी विनामास्क कॅटवॉक केला होता.त्याबद्दलही त्यांच्याविरुद्ध नाही, तर  त्यांचा मुलगा जवाहरविरुद्ध असाच गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. त्या घटनेची व त्याच्या गुन्ह्याचीही पुनरावृत्ती आज झाली.आजही उपमहापौरांविरुद्ध गुन्हा न नोंदविता तो त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल केला गेला.त्याप्रकरणी पालिका प्रशासनाच्या वतीने सुरक्षा पर्यवेक्षक दत्तात्रेय भोर यांनी फिर्याद दिली आहे. मात्र, अद्याप कोणाला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सरकारनामाला सांगितले.

गेल्या मंगळवारी (ता. २३) उपमहापौरपदाची निवडणूक भाजपच्या नानी ऊर्फ हिराबाई घुले यांनी जिंकल्यानंतर पालिका प्रवेशव्दारावरच शहरात जमावबंदी तसेच कोरोना निर्बंध असतानाही मोठा जल्लोष करण्यात आला होता. त्या मोठ्या गर्दीत अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सामाजिक अंतर,तर अजिबात राखले गेलेले नव्हते. त्यामुळे कोरोना नियमभंगाबद्दल प्रशासन तक्रार देणार का वा पोलिस स्वताहून त्याची दखल घेत कारवाई करणार का याकडे अशा नियमभंगाबद्दल दंड बसणाऱ्या व फौजदारी कारवाई होणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले असल्याची बातमी सरकारनामाने त्याच दिवशी दिली होती. तिचा इम्पॅक्ट झाला.

दरम्यान, कोरोनाने पु्न्हा जोरदार उसळी घेतल्याने गेले काही दिवस शहरात दररोज हजारावर नवे कोरोना रुग्णआढळत आहेत. दररोजचा शंभराच्या आत आलेला शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आज,तर तब्बल १८११ झाला. शिवाय त्याने १३ जणांचा बळीही आज घेतला.त्यामुळे आयुक्त राजेश पाटील हे दिवसागणिक कारवाईचा फास आवळत चालले आहेत. एकामागोमाग एक निर्बंध पुन्हा लादत आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख