एक वर्ष सरलं ! जेसीबीवरून उधळलेल्या गुलालाची लाली अजूनही कायम

एकीकडे भाजपचे राज्य पातळीवर गाजलेले `स्टार` नेते प्रा. राम शिंदे होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व नवखा उमेदवार रोहित पवार होते.
rohit and ram shinde.png
rohit and ram shinde.png

नगर : एक वर्ष सरलं. त्या आठवणीं आजही जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघात ताज्या आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. पालकमंत्री म्हणून आपली `इमेज` तयार केलेल्या प्रा. राम शिंदे यांना रोहित पवार यांनी धोबीपछाड केले. एक नव्या आशेचा किरण या मतदारसंघात उगवला. आतातरी या मतदारसंघाची नवी ओळख होईल, अशी आशा नागरिकांमध्ये पसरली.

मागील वर्षी 24 आॅक्टोबर 2019 हा दिवस मतमोजणीचा होता. या निकालाकडे  केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे लक्ष लागले होते. कारण एकीकडे भाजपचे राज्य पातळीवर गाजलेले `स्टार` नेते प्रा. राम शिंदे होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू  व नवखा उमेदवार रोहित पवार होते. भाजपच्या दृष्टीने हा गड राखला जाणे प्रतिष्ठेचे होते, तर कोणत्याही परिस्थितीत पराभव स्विकारायचा नाहीच, असा दृढ निश्चयच पवार कुटुंबियांनी केला होता. त्यासाठी गेले अनेक दिवस या मतदार संघात त्यांनी `पाणी भरले` होते.

पहिल्या फेरीपासून आघाडी कायम

मतमोजणी सुरू होती. पहिल्याच फेरीत रोहित पवार यांनी आघाडी घेतली. त्या वेळी `अजून झांकी बाकी है` या अविर्भावात प्रा. राम शिंदे होते. प्रत्येक फेरीत पवार यांनी शिंदे यांना पुढे जाऊच दिले नाही. राम शिंदे मतमोजणीस्थळी उपस्थित होते. पंधरावी फेरी होताच पराभव दिसू लागला. त्यामुळे प्रा. शिंदे `तडातडा` तेथून निघून मागच्या गेटमधून बाहेर पडले. 7777 ही गाडी पुढे उभीच होती. त्यांच्या मागे प्रतिक्रिया घेण्यासाठी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी धावत होते. शिंदे यांनी मात्र मागे न बघता तसेच चालत राहिले. अखेर गाडीत बसले आणि मतमोजणीस्थळावरून निघून गेले. इकडे रोहत पवार तहसील कार्यालयातील मीडियासेंटरमध्ये तब्बल दिड तास बसून राज्याचा आढावा घेत बसले होते. जणू आपला विजय होणार, हे त्यांना आधीच कळले होते. पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. काही वेळात अंतीम निकाल हाती आला. पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मते मिळाली. शिंदे यांना केवळ 92 हजार 247 मतांवर समाधान मानावे लागले. तब्बल 43 हजार 347 मतांनी पवार यांनी शिंदे यांच्यावर मात करून विजयश्री खेचून आणली. 

25 वर्ष फुललेले कमळ कोमजले

जामखेड मतदारसंघात पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सत्तांतर झाले होते. गेल्या 25 वर्षांचा भाजपचा बालेेकिल्ला कोसळला होता. भाजप कार्यकर्ते मात्र मतदारसंघातून गायब झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. भाजपच्या 25 वर्षाच्या काळात तीन निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी, तर दोन वर्ष प्रा. शिंदे यांनी आमदारकी केली होती. या सर्व वर्षाच्या इतिहासावर पाणी फिरले. पक्षातील काही लोकांच्या बंडामुळेच प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली. भाजपच्या हातून सत्ता हिसकावून घेत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी इतिहास घडविला. 

पराभूत उमेदवाराच्या घरी जाऊन घेतले आशिर्वाद

विजयानंतर रोहित पवार तडक मतदारसंघात गेले. पाऊस कोसळत होता. कार्यकर्ते चिंब होऊन नाचत होते. पावसात ढोल बडवत होते. रोहित पवार यांचे स्वागत करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने फुले व गुलाल उधळण्यात आला. कर्जत शहरातून रोहित पवार यांचा क्रेनच्या साह्याने पुष्पहार घालून सत्कार झाला. विजयश्रीची पताका घेऊन रोहित पवार यांनी आधी चाैंडी येथे जाऊन अहल्यादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे शिंदे कुटुंबियांची भेट घेतली. शिंदे यांच्या आईचे आशिर्वाद घेतले. राम शिंदे यांनीही रोहित पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला. मोठ्या मताधिक्यांनी पराभव पत्कारल्यानंतरही शिंदे डगमगले नाहीत. विजयी उमेदवाराचा सत्कार केला. याची चर्चा मात्र राज्यभर पसरली.

ते वचन कार्यकर्ते विसरले नाहीत

विजयानंतर आमदार रोहित पवार यांनी पराभूत उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार स्विकारला. त्या वेळी बोलताना पवार यांनी भाजप उमेदवारांना एकप्रकारे दिलासाच दिला. विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कामे घेऊन या. मात्र भांडणे करू नका, अशी विनंतीही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली. प्रचाराच्या काळात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे आरोप-प्रत्यारोप झाले होते. हाणामाऱ्याही झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे वक्तव्य सूचक होते. या वादाला एकाच भेटीत तिलांजली देऊन टाकली. हे वचन भाजप कार्यकर्ते अद्यापही विसरले नाहीत. निवडणुकीच्या काळात झालेल्या मारामारीत ज्यांची डोकी फुटली, ते मात्र जखमांवर हळूवार फुंकर घालत कावरेबावरे झाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com