पदाधिकाऱ्यांनी तक्रार करण्यापेक्षा चांगले काम करावे : विखे पाटील - Officials should do better than complain: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पदाधिकाऱ्यांनी तक्रार करण्यापेक्षा चांगले काम करावे : विखे पाटील

गाैरव साळुंके
शनिवार, 13 मार्च 2021

वर्षभरात सर्वांसमोर कोरोनाचे मोठे संकट होते. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने विकास कामांना प्रारंभ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे; परंतु नियमांचे पालन केल्यास घाबरण्याची गरज नाही.

श्रीरामपूर : "वर्षभरात सर्वांसमोर कोरोनाचे मोठे संकट होते. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने विकास कामांना प्रारंभ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे; परंतु नियमांचे पालन केल्यास घाबरण्याची गरज नाही. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम जबाबदारीचे आहे. अनेक गावांतून निधी मिळण्याबाबत तक्रारी येतात; परंतु पंचायत समितीने तालुक्‍यात सर्वत्र चांगली कामे केली. पदाधिकाऱ्यांनी तक्रारी करण्यापेक्षा चांगले काम करीत रहावे,'' असे प्रतिपादन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, सभापती संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, गणेश मुदगुले उपस्थित होते. गटविकास अधिकारी आभाळे यांनी प्रास्ताविकात पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती दिली.

हेही वाचा... नगर अर्बनच्या चार जणांना अटक

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. गटविकास अधिकारी आभाळे यांना नाशिक येथे बढती मिळाल्याबद्दल आमदार विखे पाटील यांनी आभाळे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आभाळे यांच्या कामांचे कौतुक केले. 

विखे पाटील म्हणाले, "पदाधिकाऱ्यांनी तक्रारी करण्याऐवजी चांगले काम करीत राहावे. त्यातून निश्‍चित चांगला मार्ग मिळेल. गटविकास अधिकारी आभाळे यांना मोठी संधी मिळाली असून, ते नाशिक येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी श्रीरामपूरसाठी भरीव निधी मिळण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.'' 

हेही वाचा.. प्रशांत गायकवाड यांनी अजितदादांचे ऐकले

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी आरोग्य विभागाची माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी शिक्षण विभागाची माहिती दिली. अभियंता राजेश इवळे, गोपाल सपकार, डॉ. विजय धिमते, आशा लिप्टे, प्रकाश खताळ यांनी मनोगत व्यक्‍त केले. सभापती संगीता शिंदे यांनी आभार मानले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख