नगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. या वेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आरोग्यदुतांनी कोरोनाचे नियम पालन करणे व इतरांना प्रेरीत करण्याबाबत प्रतिज्ञा केली.
कोरोनामुक्तीसाठी प्रतिज्ञा
'कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मी स्वतः माझ्या कुटुंबात, परिसरात लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे, साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टींसाठी प्रेरित करेन. कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने आणि सद्भावाने वागेन. कोरोनाच्या लढाईत आपली ढाल म्हणून उभे असलेले डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्व कार्यकर्ते यांचा मी सन्मान व समर्थन करेन व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन,' अशी प्रतिज्ञा देण्यात आली.
टाकळी खातगाव येथे प्रारंभ
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा प्रारंभ झाला. या वेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी आदी सर्व उपस्थितांना ही प्रतिज्ञा देण्यात आली.
या मोहिमेत कोरोनादूत घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी करुन त्यांची माहिती संकलित करणार आहेच. ही मोहिम २५ ऑकटोबरपर्यंत सुरु राहणार आहे. कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी, तपासणी आणि कोमॉर्बीड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठीची ही मोहिम म्हणजे आपला आरोग्य जागर आहे.
जिल्ह्यात घरोघरी जाऊन कोरोनादूत ही माहिती संकलित करणार आहेत. तसेच तपासणी करणार आहेत. त्यांना नागरिकांनी स्वताहून सहकार्य केले पाहिजे. ही मोहिम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिका केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घेतली पाहिजे. विशेषता ग्रामीण भागात नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडणे थांबवले पाहिजे. स्वच्छताविषयक सवयींचा जागर आपण पुन्हा एकदा केला पाहिजे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी ही मोहिम साहाय्यभूत ठरणार आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती यांचे पदाधिकारी,सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच-सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांचा या सहभाग या मोहिमेत असणार आहे,

