बीड हद्दीत अडवणूक ! अधिकाऱ्यालाही पाठविले जामखेडला परत 

डॉ. अमित गंभीर परत जामखेडला आले आणि माहिजळगावमार्गे त्यांनी नगरचा प्रवास केला. या गोंधळात पावणेदोन तासाच्या प्रवासाला त्यांना पावणेतीन तास लागले. डॉ. गंभीर लाल फितीच्या कारभाराचे बळी ठरले,
road closed
road closed

जामखेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची आणि रुग्णांना ठेवण्यासाठी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अमित गंभीर गेल्या आठवड्यात जामखेडला आले होते. मात्र, त्यांना येताना आणि जाताना जामखेड-नगर रस्त्यावरील आष्टी हद्दीतील आंभोरे व चिंचपूर येथील पोलिस तपासणी नाक्‍यांवर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

नगर-जामखेड रस्त्यावर बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दोन तपासणी नाक्‍यांमुळे खोट्यांबरोबरच खऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागतो आहे. नगरहून जामखेडला येण्यासाठी आष्टी तालुक्‍यातून यावे लागते. आष्टी तालुक्‍यातील आंभोरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक आणि चिंचपूर (ता. आष्टी)च्या हद्दीत दुसरा तपासणी नाका आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या स्वतंत्र तुकड्या तैनात आहेत. येणाऱ्या वाहनांसह व्यक्तींची या दोन्ही ठिकाणी कसून तपासणी होते. मात्र, यामध्ये काही व्यक्ती पासधारक नसतात आणि खोटे बोलून प्रवास करण्याचा त्यांचा इरादा असतो, तर दुसरीकडे सरकारी कामाच्या निमित्ताने येथून प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही यातून सुटका मिळत नाही. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील प्रकल्पाचे प्रतिनिधी सदस्य अधिकारी डॉ. गंभीर यांनाही या तपासणी नाक्‍याचा असाच अनुभव आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आणि नियंत्रणासाठी होत असलेल्या उपाययोजना यांची पाहणी करण्यासाठी डॉ. गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्षेत्र डॉ. गंभीर एकटेच पाहतात. जामखेड येथे पाहणीसाठी ते शासकीय वाहनातून आले होते. मात्र, परत नगरकडे जाताना त्यांना चिंचपूर हद्दीतील तपासणी नाक्‍यावरून पुढे सोडलेच नाही. डॉ. गंभीर यांनी जामखेड तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक आदींना फोन करून हकिगत सांगितली. त्यांनीही कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, काही उपयोग झाला नाही. यात डॉक्‍टर गंभीर यांचा बराचसा वेळ वाया गेला. अखेर डॉ. गंभीर परत जामखेडला आले आणि माहिजळगावमार्गे त्यांनी नगरचा प्रवास केला. या गोंधळात पावणेदोन तासाच्या प्रवासाला त्यांना पावणेतीन तास लागले. डॉ. गंभीर लाल फितीच्या कारभाराचे बळी ठरले. 

दरम्यान, याबाबत माहिती घेण्यासाठी आंभोरे येथील सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. 

बदली झालेल्या डॉक्‍टरलाही फटका 

जामखेड ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शशांक शिंदे यांनाही मालेगाव महापालिकेत बदलीच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 26) पहाटे याच रस्त्याने प्रवास करण्याची वेळ आली. त्यांना आंभोरे येथील तपासणी नाक्‍यावर तब्बल तासभर पोलिसांनी थांबवून ठेवले. डॉ. शिंदे यांनी बदलीचा आदेश दाखवला. मालेगाव हे हॉट स्पॉट असून, तेथे अत्यावश्‍यक सेवेमुळे डॉ. शिंदे यांना काही दिवसांसाठी नियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. तेथे वेळेत पोचणे आवश्‍यक होते. मात्र, या तपासणी नाक्‍यावर त्यांचा वेळ वाया गेला. काही केल्या त्यांना संबंधितांनी पुढे जाऊ दिले नाही. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जामखेड येथील कोरोना संशयित रुग्णांना नेणाऱ्या रुग्णवाहिकाही आंभोरे हद्दीतील तपासणी नाक्‍यावर पोलिस अधिकाऱ्याने अडवल्या होत्या. "या रुग्णवाहिका नगर जिल्ह्यातल्या आहेत. त्या नगर जिल्ह्यातूनच घेऊन जा. बीड जिल्ह्यातून प्रवेश करता येणार नाही,' असे त्या अधिकाऱ्याने सांगितले होते. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. मात्र, अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, असे जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी सांगितले.

तपासणी नाक्यांवर अडवणूक

जामखेड तालुक्‍यात तेरा राज्यांतील साडेपाचशे नागरिक लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. त्यांना टप्प्या-टप्प्याने त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाने स्वतंत्र वाहनांद्वारे केली. ही वाहने जामखेडहून नगरकडे पाठवली; मात्र चिंचपूर व आंभोरे येथील तपासणी नाक्‍यावरून ही वाहने परत पाठवण्यात आली. त्यांना माहिजळगावमार्गे नगरकडे पाठवावे लागले. या दोन्ही तपासणी नाक्‍यांवर अडवणूक करण्यात येते, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com