नगर : मागील महिन्यात 20 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले, तरी नगरकरांना चिंता वाटत असे. आता मात्र रोज शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असल्याने शंभरवरील आकड्याची सवय झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्येने आता दीड हजारांचा आकडा ओलांडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 54 रुग्ण बाधित आढळले. नगर शहर 10 रुग्ण आढळले. त्यामध्ये मार्केड यार्ड 3, नालेगाव, केडगाव, भिस्तबाग चाैक, सुडके मळा, रेल्वे स्टेशन, रंगार गल्ली, बागडपट्टी आदी भागात रुग्ण आढळले. श्रीरामपूर येथील श्रीरामपूर शहर, बेलापूर, शिरसगाव आदी ठिकाणी एकूण 4 रुग्ण आढळले. कर्जत तालुक्यातील शहर, माहीजळगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले. अकोले तालुक्यात 4, जामखेडमध्ये 2, नगर तालुक्यातील निंबळक, घोसपुरी, निमगाव घाना येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले. पाथर्डीत 1, शेवगाव 10, पारनेर 9, संगमनेर 6 अशा रुग्णांचा आज सकाळी आलेल्या अहवालात समावेश होता.
सायंकाळी आलेल्या अहवालात 78 रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 613 झाली असून, 920 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 38 जणांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. सध्या एकूण रुग्णसंख्या 1571 झाली आहे.
सध्या जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, संगमनेर ही शहरे बंद आहेत. तेथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. जिल्ह्यात रोज रुग्ण वाढत असल्याने प्रशासन, पदाधिकाऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. शेजारील पुणे, औरंगाबाद बरोबरच नाशिक जिल्ह्यातही संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात आले आहे. नगरमध्येही किमान दहा दिवसांसाठी पूर्णपणे व्यवहार ठप्प ठेवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सध्या जिल्हाबंदी असली, तरी ई-पास काढून लोकांची ये-जा सुरू आहे. खासगी वाहनांचीही गर्दी होत असून, संपूर्ण लाॅक डाऊन करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, यासाठी काही राजकीय नेत्यांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
नियमांची अशीही पायमल्ली
जिल्ह्यात प्रत्येक नागरिकांनी तोंडाला मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे सक्तीचे आहे. असे असले, तरी अनेक ठिकाणी या नियमांची पायमल्ली होत आहे. ग्रामीण भागात तर हे नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील किराणा दुकानातून कोरोना अधिक फैलावण्याचा धोका आहे. रुग्ण सापडल्यानंतर गाव बंदसारखे पर्याय केले जात असले, तरी ग्रामस्थांनी विशेष काळजी घेण्याची गरज अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

