वाड्यांची नावे बदलून नव्हे, जिल्हा विभाजनाने प्रश्न सुटतील

त्या वस्तीतील लोकांच्या मनातील आपले पारंपरिक नाव तसेच राहणार आहे आणि यातून तेथील भागाचा व नागरिकांचा विकास साधला जाणार नाही.
वाड्यांची नावे बदलून नव्हे, जिल्हा विभाजनाने प्रश्न सुटतील
vaibhav-pichad-28final.jpg

अकोले : केवळ वाड्या वस्त्यांची नावे बदलून विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल करत दुर्गम भागाचा विकास साधण्यासाठी समाज हिताचे राजकारण करत तातडीने नगर जिल्ह्याचे विभाजन करत संगमनेर जिल्ह्याची निर्मिती करा, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.

राज्य सरकारने राज्यातील वस्त्यांना जाती ऐवजी महापुरुषांची वा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला, तरी वस्त्यांची नावे बदलून विकास साधला जाईल काय, हा महत्त्वाचा विषय आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत आदी ग्रामीण दुर्गम भागातील वस्त्यांची नावे बदलली, तरी त्या वस्तीतील लोकांच्या मनातील आपले पारंपरिक नाव तसेच राहणार आहे आणि यातून तेथील भागाचा व नागरिकांचा विकास साधला जाणार नाही.

या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणे काळाची गरज आहे. घाटघर, आंबित,पाचनई, कुमशेत,बिताका आदी दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असल्यास पैश्या बरोबर अधिक वेळही खर्च होत आहे.

संगमनेर जिल्ह्याची निर्मिती झाल्यास खर्च होणाऱ्या रकमेबरोबर वेळही वाचेल आणि विकासाला चालनाही मिळेल, असा आशावाद पिचड यांनी व्यक्त केला. याबरोबरच विस्ताराने मोठा असलेल्या अकोले तालुक्याचेही विभाजन करत स्वतंत्र राजूर तालुक्याची निर्मिती करावी आणि संगमनेर तालुक्यातील पठार भागाला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि या भागाचा विकास करण्यासाठी घारगाव तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी पिचड यांनी केली.

दरम्यान, नगर जिल्ह्याच्या निर्मितीचा विषय महाराष्ट्रात यापूर्वीच चर्चिला आहे. आता नव्याने या विषयाला तोंड फुटले आहे.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in