पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी एकही मंत्री फिरकला नाही : विखे पाटील - No minister turns up to inspect crop damage: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी एकही मंत्री फिरकला नाही : विखे पाटील

मुरलीधर कराळे
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत.

नगर : राज्यातील एकही मंत्री झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी सुध्दा अजून फिरकला नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सुध्दा वेळ नसलेल्या मंत्र्यांनी आता, तरी बाहेर पडावे. केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा आता तातडीने मदतीची घोषणा करावी. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना त्यांनी मंत्र्यांवर टीका केली. अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने राज्यातील सर्वच विभागात थैमान घातल्याने शेतातील उभी पिक जमिनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेली पिक आणि रब्बीची सुरू असलेली पेरणी निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुहेरी अर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने आता पंचनाम्याची वाट पाहाता सरसकट मदत जाहीर करून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख