नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लाॅकडाऊन करावे, या मागणीसाठी भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी प्रशासनावर आरोप केले होते. याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच लाॅक डाऊन होणार नसल्याचे निक्षून सांगिले होते, तथापि, आज पवार यांनी या वक्तव्याचा पुनरुच्चार करून खासदार विखे पाटलांना पुन्हा दणका दिला.
नगरमध्ये सध्या कोरोनाचा आकडा वेगाने वाढत आहे. रोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी खासदार विखे पाटील यांनी प्रशासनावर आरोप केले होते. `मी स्वतः डाॅक्टर व खासदार असूनही प्रशासन माझे ऐकत नाही,` अशी तक्रार त्यांनी केली होती. त्यावर पालकमंत्री मुश्रीफ नगरला आल्यानंतर या विषयावर चर्चा होऊन लाॅक डाऊन होईल, असे वाटत होते. मात्र मुश्रीफ यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. `राज्याच्या अर्थव्यवस्था, लोकांची गैरसोय, उपासमार होत असल्याने सध्या तरी लाॅक डाऊन करता येणार नाही,` अशी कारणे देत लाॅकडाऊन होणार नसल्याचे सांगितले होते. आमदार रोहित पवार यांनीही या वक्तव्याचा पुनरुच्चार करीत लाॅकडाऊन होणार नसल्याचे सांगितले होते.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकिनंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना हा विषय पुन्हा छेडला. ते म्हणाले, की केंद्र सरकारने लाॅकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या अर्थ व आरोग्याचा मेळ घालून पुढे जाण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. नगरमध्ये कोरोनाच्या चाचण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे नजरेआड असलेले रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली, तरी कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन योग्य पाऊल टाकत आहे. अशाही परिस्थितीत कोणी लोकप्रतिनिधी लाॅकडाऊनची मागणी करीत असेल, तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही, असेच म्हणावे लागेल, असे सांगून पवार यांनी खासदार विखे पाटील यांना टोला लगावला.
सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी भाजपकडून राजकारण
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येबाबत काल खासदार विखे पाटील यांनी वक्तव्य करून राज्य सरकारवर आरोप केले होते. या प्रकरणातील संशयित आरोपी एकदाही माध्यमांसमोर आला नाही, त्यामुळे ते देशाबाहेर गेले की काय, अशी शंका विखे पाटील यांनी व्यक्त केली होती. या वक्तव्याचाही आमदार पवार यांनी समाचार घेतला.
पवार म्हणाले, ``अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी भाजप राजकारण करीत आहे. त्यांनी केवळ हवेत आरोप करू नये. पुरावे असतील, तर पोलिसांकडे द्यावेत. गेल्या पाच वर्षात ज्या पोलिसांचे संरक्षण घेतले, त्या पोलिसांवर विनाकारण आरोप करू नयेत.``

