आता धोका नको, शिवसेनेने एकसंघ राहायचे ! विक्रम राठोड यांची हाक  - No danger now, Shiv Sena wanted to remain united! Call of Vikram Rathore | Politics Marathi News - Sarkarnama

आता धोका नको, शिवसेनेने एकसंघ राहायचे ! विक्रम राठोड यांची हाक 

मुरलीधर कराळे
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

आज नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी जुन्या-नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

नगर : शहरातील शिवसेनेला एकसंघ ठेवण्यात दिवंगत नेते अनिल राठोड यांनी कायम प्रयत्न केले. जनतेनेही शिवसेनेवर प्रेम केले. त्यामुळेच 25 वर्षे आमदारकी गाजविण्यात राठोड यांना यश आले. त्यांच्याच कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे पूत्र माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी पाऊल उचलले आहे. आज नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी जुन्या-नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

नगर शहरात शिवसेनेत दोन गट आहेत. गेल्या काही दिवसांपासून या गटामधील गटबाजी जास्तच दिसून येऊ लागली. त्याचा परिणाम शिवसेनेला महापाैरपदासापूनही दूर रहावे लागले. इतर पदांवरही हात धुवून बसण्याची वेळ आली. विश्वास घात करीत ही पदे दूर गेली, असल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या स्विकृत नगरसेवकाच्या निवडणुकीत विक्रम राठोड यांना पद मिळत असूनही हे पद घेण्यास नकार दिला. अनिल राठोड यांनी निवडलेलीच यादी निश्चित करावी, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांचा एकप्रकारे सन्मानच केला. त्यामुळेच स्विकृत नगरसेवक निवडीनंतर आधी शिवालयात जाऊन (कै.) अनिल राठोड यांच्या चरणी येऊन आशिर्वाद घेतला.

आता यापुढे धोका नको, तर शिवसेनेला एकसंघ ठेवण्यासाठी विक्रम राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गटातील मतभेद मिटविण्याचे अवाहन त्यांनी केले. आता जुन्या-नव्यांचा मेळ घालण्यासाठी गुरुवारी पुन्हा बैठक घेण्याचे या वेळी ठरले. 

माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, गणेश कवडे, विजय पठारे, संग्राम शेळके, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, दीपक खैरे तसेच कार्यकर्ते बैठकिस उपस्थित होते.

शिवसेनेचाच महापाैर होणार

महानगर पालिकेत आगामी काळात महापाैर शिवसेनेचाच असेल. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे. यापुढे कोणताही धोका पत्कारायचा नाही. त्यासाठी गट-तट संपवून शिवसेना एकत्र यायचे, असा निर्णय आजच्या बैठकित घेतला. आगामी काळात सर्व नेते, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गट-तट याला तिलांजली दिली जाईल, असे मत विक्रम राठोड यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख