लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव ! जिल्ह्यात प्रथमच होणार गुप्त मतदान - No-confidence motion against elected sarpanch! Secret ballot will be held for the first time in the district | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव ! जिल्ह्यात प्रथमच होणार गुप्त मतदान

विलास कुलकर्णी
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

म्हैसगाव येथे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य व एका लोकनियुक्त सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. तीत राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत जनसेवा मंडळातर्फे थेट जनतेतून सरपंचपदी महेश गागरे, तसेच दोघे सदस्य विजयी झाले.

राहुरी : म्हैसगाव येथे बुधवारी (2 डिसेंबर) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असून, ग्रामपंचायत सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध मंजूर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर ग्रामस्थांचे गुप्त मतदान घेतले जाणार आहे. त्यावर गागरे यांच्या सरपंचपदाचा फैसला होईल. ग्रामसभेच्या सर्वोच्च अधिकाराचा जिल्ह्यात प्रथमच वापर होणार आहे. 

म्हैसगाव येथे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य व एका लोकनियुक्त सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. तीत राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत जनसेवा मंडळातर्फे थेट जनतेतून सरपंचपदी महेश गागरे, तसेच दोघे सदस्य विजयी झाले.

विरोधी भाजपप्रणीत विकास मंडळातर्फे सात सदस्य विजयी झाले. जातपडताळणीचा दाखला न दिल्याने व शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने विकास मंडळाच्या दोन सदस्यांची पदे रद्द झाली. त्यामुळे विकास मंडळाचे पाच सदस्य राहिले. सदस्य पदाच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्यामुळे म्हैसगाव ग्रामपंचायतीत सत्ताधारी तीन व विरोधी पाच सदस्य, असे बलाबल झाले. 

दरम्यान, सत्ताधारी जनसेवा मंडळाचे एक सदस्य विरोधी गोटात सामील झाले. त्यांनी मागील महिन्यात सरपंचांवर अविश्वास प्रस्ताव मंजूर केला. यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सरपंचपद रद्द ठरविले. मात्र, ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढून, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचे पद, ग्रामसभेत गुप्त मतदान घेऊन अविश्वास प्रस्ताव मंजूर होईपर्यंत रद्द करता येणार नाही, असे कळविले. तसेच, सरपंच गागरे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरपंचपद राखले. 
अवघ्या महिनाभरात वरील घडामोडी घडल्या. लोकनियुक्त सरपंचपदाचा फैसला करण्याचे सर्वोच्च अधिकार आता ग्रामसभेला प्राप्त झाले. नगर जिल्ह्यात प्रथमच लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर ग्रामसभेत मतदान होणार असल्याने, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

बुधवारी होणार ग्रामसभा

म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी 23 ऑक्‍टोबर रोजी लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर केला. त्यावर येत्या बुधवारी (दोन डिसेंबर) विशेष ग्रामसभा घेऊन, गुप्त मतदानाने अंतिम निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख