No clarity in PM's speech: Thorat | Sarkarnama

पंतप्रधानांच्या भाषणात स्पष्टता नाही ः थोरात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 मे 2020

या भाषणातून पंतप्रधानांनी काय दिलं, असा प्रश्न निर्माण होतो. आत्मनिर्भरता याचा अर्थ ज्याने त्याने, ज्याचं त्याचं पाहणे. 20 लाखाचे पॅकेज म्हणजे काय, कसे देणार, तु्म्ही कशा पद्धतीने व्यापाराला, सर्वसामान्यांना ताकद देणार आहात, हे कुठेही सापडत नाही.

नगर : ``पंतप्रधान नरेंद्र यांनी आपल्या भाषणातून जनतेला काहीच दिले नाही. त्यांच्या भाषणात कोणतीही स्पष्टता नाही. केवळ भुलभुलैय्या करणे व कोरोनाच्या कठिण परिस्थितीही मतांची पोळी भाजण्याचे भाजप नेत्यांच्या मनात येत असेल, तर हे मोठे दुर्दैव्य आहे,`` अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणानंतर थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकाश्र सोडले. देशाला या भाषणातून काहीच मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. थोरात म्हणाले, ``या भाषणातून पंतप्रधानांनी काय दिलं, असा प्रश्न निर्माण होतो. आत्मनिर्भरता याचा अर्थ ज्याने त्याने, ज्याचं त्याचं पाहणे. 20 लाखाचे पॅकेज म्हणजे काय, कसे देणार, तु्म्ही कशा पद्धतीने व्यापाराला, सर्वसामान्यांना ताकद देणार आहात, हे कुठेही सापडत नाही. भुलभुलैय्या करणे, मतांची पोळी भाजणे, यापलिकडे त्यांचे काहीच धोरण नाही. कोरोनाच्या परिस्थितीतही आपला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल, याचाच विचार जर या भाजपच्या मनात येत असेल, तर ते देशाचे दुर्दव आहे,`` असे ते म्हणाले.

हेही वाचा...

कुटुंबीयांसह घरातच उपोषण 

श्रीरामपूर : राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा संपूर्ण पगार करावा, तसेच अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृतिसमितीच्या वतीने राज्याचे अध्यक्ष प्रा. तान्हाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यासह राज्यातील प्राध्यापकांनी सोमवारपासून (ता. 11) आपल्या कुटुंबीयांसह घरातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या महिला राज्याध्यक्ष प्रा. सुनीता गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने याप्रकारे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक सुमारे वीस वर्षांपासून विद्यादानाचे काम बिनपगारी करीत आहेत. आज ना उद्या शासन न्याय देईल, अशी आशा त्यांना आहे. सन 2009पासून प्राध्यापकांची सुमारे अडीचशे आंदोलने झाली. त्याचा परिणाम म्हणून सन 2014मध्ये "कायम' शब्द काढून टाकण्यात आला. सन 2019मध्ये सर्व महाविद्यालयांची चौकशी करून पात्र महाविद्यालयांची यादी घोषित करण्यात आली; परंतु किरकोळ त्रुटींमुळे अनेक महाविद्यालये त्यात अपात्र ठरविली गेली. त्या महाविद्यालयांकडून त्रुटींची पूर्तता केली असतानाही अद्याप त्यांना पात्र घोषित केलेले नाही. 

वीटभट्टीसह गवंडीकामाची प्राध्यापकांवर वेळ 
यामुळे काही शिक्षकांना महाविद्यालयातून घरी आल्यावर दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणे, गवंडीकाम करणे, रिक्षा चालविणे, चहाचे दुकान चालविणे, वीटभट्टीवर काम करणे, अशी कामे करण्याची वेळ आली आहे. काही शिक्षकांना आपल्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांच्याच शेतात कामाला जावे लागत आहे. सुमारे वीस वर्षांपासून अशाच विदारक परिस्थितीमध्ये शिक्षक जीवन जगत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या परिस्थितीचा विचार करता, सर्व प्राध्यापकांच्या खात्यांवर ऑफलाइन पगार सुरू करावा. तसेच, जी महाविद्यालये अघोषित आहेत, त्यांना घोषित करून त्यांच्या खात्यावरही ऑफलाइन पगार देण्यात यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. 
प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत भर उन्हात आंदोलनप्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत. मात्र, शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात घरबसल्या उपोषण सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात शासनाने गांभीर्याने विचार करून प्राध्यापकांचे प्रश्न सोडविले नाहीत, तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रा. गायकवाड, जिल्हाध्यक्ष सचिन पालवे, प्रा. उमादेवी शेळके, प्रा. अबू इनामदार, प्रा. सुभाष चिंधे, प्रा. बाळासाहेब गुंजाळ, प्रा. संजय बाबर यांनी दिला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख