Nilesh Rane's number one, but in what ... | Sarkarnama

निलेश राणे यांचा नंबर पहिला, पण कशात?

मुरलीधर कराळे
बुधवार, 20 मे 2020

दोन दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत वापरलेल्या शब्दाला मंत्री तनपुरे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले होते. त्यातील काही शब्द राणे यांना चांगलेच झोंबले. त्याला राणे यांनी कडक शब्दांत उत्तर दिले होते. तथापि, याचा समाचार काल रात्री आमदार पवार यांनी ट्विटरवरून घेतला.

नगर : माजी खासदार निलेश राणे व आमदार रोहित पवार यांच्यातील ट्विटयुद्ध काही संपायला तयार नाही. राणे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ट्विटला उत्तर देताना असभ्य शब्द वापरला. त्यामुळे चिडलेल्या आमदार रोहित पवार यांनी राणे यांच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे. ``एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो,`` असे ट्विट करून रोहित पवार यांनी राणे यांच्या `कडक` शब्दाला `स्पाॅफ्ट` पद्धतीने उत्तर दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्याबाबत वापरलेल्या शब्दाला मंत्री तनपुरे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले होते. त्यातील काही शब्द राणे यांना चांगलेच झोंबले. त्याला राणे यांनी कडक शब्दांत उत्तर दिले होते. तथापि, याचा समाचार काल रात्री आमदार पवार यांनी ट्विटरवरून घेतला. ``आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत, हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात. पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो,`` अशा शब्दांत पवार यांनी ट्विट केले आहे. 

ट्विटर पेटले राजकीय युद्ध

यापूर्वी साखर उद्योगाबाबत शरद पवार यांच्यावरील राणे यांच्या ट्विटला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले होते. त्या वेळी राणे यांनीही तीव्र शब्दांत आमदार पवार यांचा समाचार घेतला होता. या वादात मध्येच मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मध्येच उडी घेतली. तनपुरे यांनी ट्विटरवर वापरलेला ``प्रसंगी राष्ट्रवादी कार्यक्रमच करते,`` हा शब्द राणे यांना चांगलाच झोंबला. त्याला उत्तर देताना राणे यांनी पुन्हा तनपुरे यांच्यावर असभ्य शब्द वापरत तोफ डागली. ``असे कार्यक्रम करणारे खूप बघितले, जागा सांगा मी येतो,`` असे म्हणून राणे यांनी तनपुरे यांना आव्हानच केले. त्यामुळे ट्विटरवरील हे राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. राणे यांच्या या आव्हानाला उत्तर देताना काल आमदार पवार यांनी घेतलेला समाचार सध्या राज्यभर चर्चेचा ठरत आहे. 

ट्विटरधारकांची टीवटीव

या ट्विटर युद्धात मात्र ट्विटरधारकांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दोघांच्याही समर्थकांनी आपापल्या नेत्यांचे म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करताना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. काहींनी या ट्विटयुद्धाची खिल्लीही उडविली आहे. 

.

 

हेही वाचा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रशासनाला मदतीची तयारी

 
नगर : देशभरात लॉकडाउनमुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मदत करण्याचे काम महापालिका व जिल्हा प्रशासनाला करावे लागत आहे. महापालिका प्रशासनाला मदत व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महापालिकेला कोरोनासंदर्भातील कामाची जबाबदारी देण्याची विनंती महापौर बाबासाहेब वाकळे व महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना भेटून केली. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. या कामाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत व्हावी, या उद्देशाने संघाचे जिल्हा प्रचारक अविन देवकाते, शहर संघचालक वाल्मीक कुलकर्णी, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, राहुल ढवळे आदींनी महापालिकेत जाऊन आयुक्त व महापौरांची भेट घेतली, तसेच महापालिकेकडून स्वयंसेवकांना कामाची जबाबदारी देण्याची विनंती केली. 

अविन देवकाते म्हणाले, ""जिल्हा प्रशासनाकडून परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येते. शहरातील परप्रांतीय नागरिकांची यादी महापालिका प्रशासन देते. यादीतील 30 ते 40 जणांच्या बसचा खर्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात येणार आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून शहरात रक्तसंकलनाचे कार्य स्वयंसेवक करीत आहेत. शहरातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी हे कार्य सुरू आहे.'' 

महापौर वाकळे म्हणाले, ""राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक कार्य करणारी देशातील अग्रणी संस्था आहे. देशावर येणाऱ्या संकटात नागरिकांना मदत करण्याचे कार्य संघाकडून केले जाईल. नगरमध्येही महापालिका देत असलेल्या कोरोनाविरोधातील लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत करू इच्छित आहे, ही भूषणावह बाब आहे.'' 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख