नगर : ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी बक्षिसे जाहीर करून आवाहन केले. राज्यातील अनेक आमदारांनी अशी घोषणा केली. त्याला संमिश्र यश आले आहे. जिल्ह्यात आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके यांच्या मतदार संघात बिनविरोधला प्रतिसाद मिळाला.
पारनेर तालुक्यात आमदार लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 9 ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकल्या. लंके यांच्या गावही बिनविरोध झाले. याच तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेले राळेगणसिद्धीत मात्र निवडणूक रंगणार आहे. अशीच स्थिती नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजारचीही झाली आहे. तेथेही दोन गटांत निवडणूक होणार आहे.
जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनाला 10 ग्रामपंचायतींनी साद दिली. पवार यांनी गेल्या आठ - दहा दिवसांपासून अनेक ठिकाणी बैठका घेऊन ग्रामपंचायती बिनविरोधसाठी प्रय़त्न केले होते.
अकोले तालुक्यातील आमदार डाॅ. किरण लहामटे यांनीही बक्षिसे जाहीर केल्याने तेथेही 11 ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकल्या. त्यापैकी काही ग्रामपंचायतींवर भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांचे वर्चस्व आहे. असे असले, तरी डाॅ. लहामटे यांनी जाहीर केलेले बक्षिस या गावांना मिळणार आहे.
राहाता तालुक्यात भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा गड शाबुत आहे. त्यांचे गाव असलेले लोणी खुर्द बिनविरोध झाले. यासह या तालुक्यात 6 ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकल्या. या ग्रामपंचायती विखे पाटील यांना मानणाऱ्या आहेत.
नगर तालुक्यात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. नेवासे तालुक्यात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. मात्र त्यांचे गाव असलेले सोनईत मात्र लढत होणार आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहुरी आदी तालुक्यांत मात्र ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकल्या नाही.

