`निघोज`ला बिनविरोध व्हायचंय, पण महिलांच्या पॅनलचे काय ? - Nighoj wants to be unopposed, but what about the women's panel | Politics Marathi News - Sarkarnama

`निघोज`ला बिनविरोध व्हायचंय, पण महिलांच्या पॅनलचे काय ?

अनिल चाैधरी
सोमवार, 21 डिसेंबर 2020
बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक झाल्यास 25 लाखांचा निधी देण्याचे आश्‍वासन आमदार लंके यांनी दिले आहे. त्यानुसार, तालुक्‍यातील गावपुढारी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

निघोज : तालुक्‍यातील सर्वात मोठी निघोज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी बोलाविलेल्या बैठकीत पुढाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, सर्वजण राजी झाले असले, तरी गावातील दारूबंदी हटविल्याचा मुद्दा या बिनविरोध निवडीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. दारुबंदी केली असताना काही नेत्यांनी ती पुन्हा उठविली. त्यामुळे महिला आक्रमक झाल्यास असून, या नेत्यांविरोधात त्या स्वतंत्र पॅनल करणार आहेत. आता लंके यांच्या आवाहनाला महिला राजी होतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक झाल्यास 25 लाखांचा निधी देण्याचे आश्‍वासन आमदार लंके यांनी दिले आहे. त्यानुसार, तालुक्‍यातील गावपुढारी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राळेगणसिद्धी पाठोपाठ तालुक्‍यातील सर्वात मोठ्या गावाची निघोजची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.

लंके यांनी बोलविलेल्या बैठकीत माजी सरपंच ठकाराम लंके, रंगनाथ वराळ, सचिन वराळ, प्रभाकर कवाद यांनी लंके यांनाच योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार दिला. मात्र, सोमनाथ वरखडे यांनी आमच्या गटाला योग्य प्रतिनिधीत्व न मिळाल्यास स्वतंत्र तिसरे मंडळ उभे करणार असल्याची भूमिका घेतली. सुरवातीला दोन किंवा तीन पॅनेलमध्ये लढत होण्याची चिन्हे होती. त्यानंतर सर्वांनी सत्ता व प्रतिनिधित्व समप्रमाणात विभागून घेण्याचा विचार पुढे आला. या विचारावर सहमती होण्याची शक्‍यता वाटत असताना, दारूबंदी चळवळीचे दत्ता भूकन यांनी गावात झालेली दारूबंदी उठविणारांना संधी देऊ नये, अशी भूमिका घेतली. बबन कवाद यांनी गेल्या वेळेला पराभूत झालेल्या लोकांना यंदा बिनविरोध संधी देण्याची मागणी केली. प्रस्थापितांनी इतरांना संधी देण्याची मागणी तरुणांनी केली आहे. निघोजची दारूबंदी हटविणे ही गंभीर चूक असल्याचे लंके म्हणाले. मात्र, त्यातूनही काही तरी मार्ग काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे निघोजची निवडणूकही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, यापूर्वी गावातील महिलांनी एकत्र येत दारुबंदी केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच पुढाऱ्यांनी एकत्र येत पुन्हा दारूविक्री सुरू केली. त्यामुळे गावातील महिला चिडल्या. आता निवडणूक असल्याने आपण या पुढाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभा करू, असे महिलांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार लंके आता महिलांनाच संधी देणार की नेत्यांमध्ये समेट घडवून दारु विक्री पुन्हा सुरू केलेल्यांना संधी देणार, याबाबत गावात उत्सुकता आहे. या ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख