The new suburb was infiltrated by Corona, Bolhegaon Fata area | Sarkarnama

नगरच्या उपनगरांत वाढतोय कोरोना, बोल्हेगाव फाटा परिसर हबकला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 जून 2020

एमआयडीसीलगतच असलेल्या बोल्हेगाव फाटा परिसरातही आज कोरोनाचा एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आज तीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 261 झाली आहे.

नगर : नगर शहराबरोबरच यापूर्वी न सापडलेल्या उपनगरात कोरोना घुसतो आहे. एमआयडीसीलगतच असलेल्या बोल्हेगाव फाटा परिसरातही आज कोरोनाचा एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आज तीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 261 झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 37 कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

जिल्ह्यातून बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. आज तीन जणांची भर पडली, तर सात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण सापडले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज सापडलेल्या रुग्णांमुळे नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

कुर्ला येथे चालक म्हणून नोकरीस असलेली 41 वर्षीय व्यक्ती शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे  आली होती. ताप व श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे नगर शहराचे उपनगर असलेले बोल्हेगाव फाटा येथे कुर्ला येथून आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आला आहे. राहाता शहरातील एका व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

शेवगाव तालुक्यातील मुंबई येथे अनेक लोक आहेत. ते आता हळूहळू गावाकडे येत आहेत. जिल्ह्यात विशेषतः मुंबईहून आलेल्या लोकांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तींमुळे त्यांच्या घरातील इतर व्यक्तींना बाधा होत असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासन वारंवार करीत आहे, मात्र ग्रामस्थांकडून याबाबतची माहिती लवकर दिली जात नाही. बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच त्याला गावात घेतले, तर ही समस्या उद्भवणार नाही. मात्र तसे होत नाही. 

आज पाॅझिटिव्ह आलेल्यांपैकी दोन रुग्ण कुर्ला येथून आलेले आहेत. दोघेही वाहनचालक आहेत. नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांची तपासणी केली असती, तर त्यांच्यापासून इतरांना बाधा झाली नसती. आता त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी घेतले जाणार असून, त्यांच्या अहवालाकडे परिसरातील लोकांचे लक्ष लागणार आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख