शिर्डीच्या विकासासाठी आमदार विखे पाटीलांचे हे नवीन धोरण - This is the new strategy of MLA Vikhe Patil for the development of Shirdi | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीच्या विकासासाठी आमदार विखे पाटीलांचे हे नवीन धोरण

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन व खंडोबा व्यापारी संकुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

शिर्डी : "देशाचा विकासदर काही वर्षांत चीनला मागे टाकील, असा दावा जागतिक पातळीवर आर्थिक संस्था करू लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थनीतीचे हे फलित असेल. त्यांनी विरोधकांना आपल्या कामाच्या माध्यमातून उत्तर दिले. स्वच्छ शिर्डी व सुरक्षित शिर्डी असे धोरण घेऊन भवितव्य घडविण्यासाठी आपण शिर्डीकरांच्या पाठीशी उभे आहोत. येथील हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळवून देऊन अर्थकारणाला चालना देण्यासाठी पुढाकार घेऊ,'' असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन व खंडोबा व्यापारी संकुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्‍चंद्र कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, अनिता जगताप, ज्ञानेश्‍वर गोंदकर, सचिन शिंदे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. प्रयोगशील शिक्षक अजमत इक्‍बाल यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. "आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत गटई कामगार आणि दिव्यांग व्यक्तींना मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. 

विखे पाटील म्हणाले, ""शहरातील व्यवसाय आणि अर्थकारणावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. तथापि, हतबल होऊन चालणार नाही. विविध कंपन्यांची गुंतवणूक आपल्या भागात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. नगरपंचायतीचा गौरव देशपातळीवर झाला, ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.'' 

भारताची प्रतिमा उंचावली

भारताने कोविडची लस तयार करून जगाचे लक्ष वेधून घेतले. बाहेरच्या देशांसाठी ही लस पाठविण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व देशाला लाभले. जनाधार हरवलेली मंडळी कुठल्या कुठल्या कारणावरून देशातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करतात. जनता मात्र पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. 
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख