संगमनेर : कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदुरीकर) महाराज यांच्यावरील खटल्यातील सरकारी वकिलाने वकिलपत्र मागे घेतल्याने आज नवीन वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे. आजहोणार असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता या खटल्याची सुनावणी 2 डिसेंबरला होणार आहे.
अपत्य जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कीर्तनकार निवृती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे.
इंदुरीकर महाराजांचे वकील अँड. के. डी. धुमाळ यांच्याकडे सरकारी वकील अॅड. बी. जी. कोल्हे यांच्या भावाचे न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे. या संबंधाचा इंदुरीकरांच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप झाल्याने कोल्हे यांनी या प्रकरणी व्यक्तीगत चिखलफेक होण्यापेक्षा मला या खटल्याच्या कामात स्वारस्य नसल्याचे सरकारी वकिल कार्यालयास कळवून आपले वकील पत्र मागे घेतले आहे. त्यामुळे आता या खटल्यासाठी सरकारी पक्षाने अॅड. अरविंद राठोड यांची नियुक्ती केल्याची माहिती न्यायालय अधीक्षकांनी दिली.
या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अँड. रंजना गवांदे बाजू मांडीत आहेत. सर्वांना लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांबाबतच्या या खटल्याच्या सुनावणीकडे नगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे लक्ष लागले आहे. कीर्तनातून केलेल्या एका वक्तव्याबाबत इंदुरीकर महाराजांच्या सुरू असलेल्या या खटल्याच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आता सरकारी वकील बदलले असल्याने पुढील काळात हे कामकाज वेगाने होऊ शकते, अशी शक्यता आहे.
Edited By - Murlidhar Karale

