नवीन कोरोना ! इंग्लंडहून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची वाढली संख्या - New Corona! Increased number of passengers traveling from England | Politics Marathi News - Sarkarnama

नवीन कोरोना ! इंग्लंडहून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची वाढली संख्या

मुरलीधर कराळे
शनिवार, 26 डिसेंबर 2020

या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.

नगर : इंग्लंडहून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरणद्वारे आलेली यादी राज्य सरकारने संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविली आहे. त्यानुसार, महानगर पालिका क्षेत्रात एकूण १९, तर ग्रामीण भागातील ६ प्रवाशी, असे २५ प्रवाशी इंग्लंडहून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.

२४ रोजी जिल्ह्यातील १२ नागरिक, तर आज आणखी १३ जणांची यादी प्राप्त झाली. त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेने या प्रवाशांची माहिती घेतली.

काल महानगरपालिका क्षेत्रातील १० प्रवाशांपैकी २ जण मुंबई येथे क्वारंटान आहेत, तर  ७ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. २५ रोजी ९ पैकी ८ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यापैकी एक अहवाल निगेटिव्ह आला असून, उर्वरित अहवालाची प्रतीक्षा असल्याचे महानगर पालिका आरोग्य यंत्रणेने सांगितले.

ग्रामीण भागातील कालच्या श्रीगोंदे आणि संगमनेर येथील  प्रवासी अनुक्रमे मुंबई, तर दुसरा पुणे येथे आहे. काल आणखी ४ प्रवाशांची माहिती मिळाल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.

 

हेही वाचा...

शेतकऱ्यांशी संवाद साधून शंकांचे निरसन करावे : विखे पाटील

राहाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्‍या कृषि विधेयकांच्‍या संदर्भात कार्यकर्त्‍यांनीच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधुन विधेयकातील तरतुदींबाबत शंकाचे निरसन करावे, बाजार समितीच्‍या माध्‍यमातून यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती माजीमंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. 

माजी पंतप्रधान स्‍व. अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संवाद साधला. शहरातील जिल्‍हा सहकारी बॅंकेच्‍या सभागृहात या रॅलीमध्‍ये तालुक्‍यातील विविध संस्‍थाच्‍या पदाधिकारी आणि कार्य‍कर्त्‍यांनी सहभाग नोंदविला.

या वेळी भाजपाचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष अॅड. रघुनाथ बोठे, गणेश कारखान्‍याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर उपस्थित होते. 

आमदार विखे पाटील म्‍हणाले, की कृषि विधेयकाच्‍या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून सर्वच शंकाचे निरसन केले आहे. गावपातळीवर आता कार्यकर्त्‍यांनी कृषि विधेयकाच्‍या संदर्भात शेतक-यांशी थेट संवाद साधुन या विधेकातील तरतुदींबाबतची माहिती देण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या माध्‍यमातून लवकरच परिसंवादाचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख