जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश ! ऑगस्ट महिन्यात सातच्या आत घरात - New Collector's order! At home within seven in the month of August | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश ! ऑगस्ट महिन्यात सातच्या आत घरात

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 31 जुलै 2020

सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थनागृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहणार आहेत. 

नगर : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 31 आॅगस्टपर्यंत विविध उपाययोजना सांगत सध्याचे सर्व आदेश जैसे थे असून, त्यामध्ये काही नियमांची भर घातली आहे. प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्वांना फिरण्यास सायंकाळी 7 नंतर बंदी घातली असून, पहाटे 5 पर्यंत निर्बंध करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नगर जिल्‍हा महसूलस्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास या आदेशान्‍वये 1 ऑगस्ट ते ता. 31 ऑगस्ट पर्यंत मनाई राहिल. सार्वजनिक ठिकाणी 5 कंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी राहणार नाही. 

सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थनागृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहणार आहेत. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम आदीसाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे, प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर, फिरण्‍यावर सायंकाळी 7 ते सकाळी 5 या कालावधीत निर्बंध राहील. 65 वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्‍यावश्‍यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्‍यास मनाई राहणार आहे. सर्व नागरिकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्‍यास मनाई राहील. 

या आदेशापूर्वी जी अत्‍यावश्‍यक दुकाने उघडण्‍यास मुभा देण्‍यात आली होती, ती सर्व दुकाने तशीच सुरु राहतील. शारीरिक अंतर ठेवून व स्‍वच्‍छतेच्‍या उपाययोजना करुन प्रती बस, कमाल मर्यादा 50 टक्के क्षमतेसह जिल्‍ह्यांतर्गत बस सेवा चालविण्‍यास परवानगी असेल. आंतरजिल्‍हा वाहतुकीचे, नियमितपणे विनियमन (ई-पास व्‍दारे) करण्‍यात येईल. सर्व बिगर-अत्‍यावश्‍यक बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. मॉल्‍स आणि बाजारसंकूले 5 ऑगस्‍टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत खुले राहतील. मॉलमधील रेस्‍टॉरंट्स व फूड कोर्टसचे किचन यांना स्‍थानिक प्राधिकरणाचे एसओपी नुसार होम डिलिव्‍हरीची परवानगी असेल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख