नवी दिल्ली : शैक्षणिक संशोधनातील आदान प्रदानाबाबत भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) व युरोपीयन महासंघ यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे भारतातील तरूण संशोधकांना आता युरोपातील नामवंत विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये अधिक सुलभपणे प्रवेश मिळू शकेल. भारत व युरोपीय देशांमधील अशा प्रकारचा हा आतापर्यंतचा दुसराच करार आहे.
या करारानुसार शैक्षणिक संशोधन करू इच्छिणाऱ्या भारतीय तरूणांना युरेपियन संशोधन परिषदेकडून (ईआरसी) फेलोशीपही मिळू शकेल. युरोपीयन महासंघाचे राजदूत ह्यूगो ऍस्टेटो व आयसीएसएसआरचे सचिव प्रा. व्यंकट कुमार यांनी एका व्हीडीओ कॉन्फरन्सिंग कार्यक्रमात या करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या केल्या. युरोपीय महासंघाच्या मारिया क्रिस्तानिया रूसो, युरोपीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रा. जीन पिएरे बौगुईगॉन, आयएसएसआरचे अध्यक्ष व यूजीसीचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन आदी उपस्थित होते.
या करारामुळे ज्या भारतीय उच्चशिक्षित तरूणांना आता युरोपातील संशोधकांबरोबर मिळून काही संशोदन करायचे असेल, त्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी संबंधितांची निवड आयएसएसआरतर्फे निवडण्यात येतील. युरोपीय महासंघाने भारताबरोबर समाजविज्ञान व मानववंशशास्त्र यासारख्या विषयांतील शैक्षणिक संशोधनातील देवाणघेवाण गेल्या सहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. कोरोना महामारीमुळे सध्या या प्रक्रियेला ब्रेक लागला असला, तरी यासाठी युरोपात जाण्यास उत्सुक असणाऱ्या तरूणांची वाढती संख्या आहे. हा करार म्हणजे भारत व युरोपीय देशांतील शैक्षणिक सहमतीचा पहिला महत्वाचा टप्पा ठरू शकतो. यामुळे भारतीय व युरोपीय संशोधकांना आपापल्या ज्ञानाचे व अनुभवांचे आदानप्रदानही सुरक्षितपणे करता येऊ शकते, असे मारिया रूसो यांनी या वेळी सांगितले. आगामी काळात युरोपमध्ये या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, त्याचा भारतातील तरूण निश्चित लाभ घेतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. पटवर्धन म्हणाले, की भारताला वैज्ञानिक व समाजविज्ञानासारख्या विषयांतील संशोधनाची दीर्घ परंपरा आहे. युरोप व भारतातील मानवी वस्ती, नागरीकरण व सांस्कृतीक मूल्यांबाबतच्या संशोधनासाठी हा करार महत्वपूर्ण ठरेल असेही त्यांनी सांगितले.
2007 मध्ये स्थापन झालेल्या ईआरसीने पहिल्या वर्षी 62 भारतीय तरूणांना युरोपात संशोधनासाठी परवानगी व अभ्यासवृत्ती दिली. भारताबरोबरचा हा नवा करार येथील तरूण संशोधकांसाठी "विन विन' स्वरूपाचा ठरेल व त्यांना युरोपातील संशोधनाच्या नव्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास प्रा. बौगुईगॉन यांनी व्यक्त केला.
अमेरिका व कॅनडातील वैज्ञानिक उच्चशिक्षण अभ्यासक्रमांत भारतीय तरूण त्या देशांपाठोपाठ चमकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ईआरसीतर्फे सुमारे 173 विषय, प्रकल्पांतील संशोधनासाठी विदेशी विद्यार्थ्यांना भरघोस अभ्यासवृत्ती देण्यात येते. यासाठी त्या महासंघाने 13 अब्ज युरो इतकी आर्थिक तरतूद केली आहे. सध्या या संस्थेच्या मदतीने 9 हजार 500 तरूण युरोपातील विविध देशांत संशोधन करत आहेत. आयसीएसएसआरतर्फे 2016 पासून आतापर्यंत 7 हजार 113 तरूणांना अभ्यासवृत्ती देण्यात आली आहे.
Edited By - Murlidhar Karale

