नगर : शहरातील यापूर्वीच्या राष्ट्रवादी व शिवसेनेमधील मतभेदाला आता स्थायी समितीच्या निमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थांची भूमिका बजावत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणले आहे.
आजच्या घडामोडीमुळे शिवसेनेला जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने नवीन भक्कम चेहरा मिळाल्याचे, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे `किंगमेकर` असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी भूमिका स्पष्ट करताना आता नगरमधील शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील मतभेद पूर्णपणे मिटले असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष समन्वयाने लढणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी व शिवसेनेत कायम मतभेत असत. त्याचाच भाग म्हणून महापाैर निवडीच्या वेळी राष्ट्रवादीने भाजपला मदत करून शिवसेनेला एकाकी पाडले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर मात्र शिवसेनेला आता नवीन चेहरा कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात शिवसेना काम करेल, हे दिसून येऊ लागले.
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळला. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार मनोज कोतकर हे बिनविरोध सभापती झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये समन्वय वाढला. हे सर्व घडवून आणण्यासाठी मंत्री गडाख व आमदार जगताप यांची भूमिका महत्त्वाची राहिली.

