नगरचे नाव आंबिकानगर करा : खासदार लोखंडे  - Name the town Ambikanagar: MP Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

नगरचे नाव आंबिकानगर करा : खासदार लोखंडे 

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे.

शिर्डी : औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली. 

औरंगाबादमध्ये शहराच्या नामकरणावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. नामकरणाबाबत कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले. विरोधकांनी शहराची नावे बदलण्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे पहावे, असे ते म्हणाले होते. तोच धागा पकडून शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी नगरबाबतही वक्तव्य करून नवीन वादाची ठिणगी टाकली आहे. 
ते म्हणाले, की औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, ही जनतेची मागणी आहे. ते अपेक्षितच आहे. याबाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतली. परंतु औरंगाबादबरोबरच अहमदनगरचेही नामकरण करून "आंबिकानगर' असे व्हावे, अशी आमची मागणी आहे. 

 

हेही वाचा..

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिर्डीत

शिर्डी : साईबाबांच्या समाधिवर माथा टेकवीत मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा. पहाटे पुन्हा साई मंदिरात दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करायचे. हा रिवाज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यंदाही पाळला.

साईदर्शनानंतर शनी शिंगणापूरची वारी टळू नये, यासाठी त्यांनी आज शिर्डी ते इंदौर आणि पुन्हा इंदौर ते शिर्डी असा दुहेरी विमानप्रवास केला. आणि शनीशिंगणापूरची वारी देखील साधली. 

ते मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षाअखेरीस साईदर्शनासाठी येथे येतात. मुख्यमंत्री या नात्याने गाड्यांचा ताफा सोबत असला, तरी साधेपणाने साईदर्शन घेणे पसंत करतात. येथील कुठल्याही तारांकीत हाॅटेलात न जाता साईसंस्थानच्या प्रसादालयात जाऊन भोजन घेतात. यंदाही त्यांनी हा रिवाज पाळला. 

काल सायंकाळी ते चॅर्टर प्लेन ने येथे दाखल झाले. भाजपचे नेते व साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. साईदर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या कृषि कायद्याचे जोरदार समर्थन केले. हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगितले. आज पहाटे त्यांनी पुन्हा साईमंदिरात जाऊन साई समाधिचे दर्शन घेतले. नव्या वर्षाची सुरवात साई समाधिच्या साक्षीने करण्याचा रिवाज यंदाही कायम ठेवला. 

साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी दिलेल्या माहीतीनुसार त्यांना आज दुपारी इंदौरमध्ये एका महत्वाच्या बैठकीसाठी उपस्थित रहाणे आवश्यक होते. त्याच बरोबर शिंगणापूरला शनीदर्शनासाठी देखील जायचे होते. ते येथून विमानाने इंदौरला गेले. दुपारी चारच्या सुमारास बैठक आटोपून पून्हा शिर्डीत दाखल झाले. त्यानंतर लगेचच मोटारीने शिंगणापूरकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जायचे आहे. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख