नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघात मी दहा वर्षे प्रतिनिधीत्त्व केल्यामुळे मी अनेक कामे करू शकलो. त्यामुळे लोक माझ्याकडेच प्रश्न घेऊन येतात. ते उर्जामंत्री आहेत, मात्र विजेचे प्रश्न घेऊन रोज अनेक शेतकरी माझ्याकडे येतात. त्यांचे मंत्रीपद केवळ नावालाच आहे, अशी टीका भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली.
नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना खेळते भांडवल वाटप करताना त्यांनी तनपुरे यांचा समाचार घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव लामखेडे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे तसेच मान्यवर उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, की अतिवृष्टीमुळे सध्या शेतकरी अडचणीत आहे. अशा वेळी त्यांना कोणीतरी मदतीची गरज आहे. त्यामुळेच जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला. खेळते भांडवल म्हणून हे कर्ज दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. सध्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या असलेली पिकांवरही औषधांचा मारा करावा लागत आहे. त्यासाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेडून मिळालेल्या या मदतीचा हात शेतकऱ्यांना पुढे घेऊन जात आहे.
विजेच्या प्रश्नांबाबत बोलताना ते म्हणाले, की उर्जामंत्री केवळ नावालाच आहेत. शेतकरी माझ्याकडेच विजेबाबतच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे येत आहेत. मी त्यांचे प्रश्न सोडवितो. ऊर्जामंत्री घाटावरील गावांवर फिरकत नाहीत. त्यांच्या मतदारसंघातच त्यांना कामे करता येत नसतील, तर ही बाब योग्य नाही. उर्जामंत्र्यांनी आता शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे. विजेचे प्रश्न सोडविले पाहिजे, असे टोला त्यांनी तनपुरे यांना लगावला.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी कर्जवितरण सुरू आहे. शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत खेळते भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यातून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात चांगले पैसे उपलब्ध झाले आहेत. त्यातून दुग्धव्यवसायाला चालना मिळणार आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते, असा आरोप त्यांनी केला.
केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना दिल्या जात आहेत. अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यायला हवा. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीला पूरक उद्योगांची जोड दिली पाहिजे, असे कर्डिले यांनी सांगितले.
दरम्यान, नगर तालुक्यातील बहुतेक गावांनी या योजनेचा लाभ घेतला असून, सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज वितरित करताना कर्डिले विविध कार्यक्रम घेत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना या योजनांची माहिती होत आहे.

