नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागासाठी 11 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येतील, असे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांनी पुण्यातील राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन संचालकांना दिला आहे.
नगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागाकडील योजनांवर निधी खर्च करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मंजुरी मागितली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदीस परवानगी दिली. त्यासाठी पाच कोटी 85 लाख रुपये खर्च करता येतील. एक रुग्णवाहिका 13 लाख रुपयांची असेल.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-30 औषधवाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, नगर जिल्हा परिषदेला एक कोटी 48 लाख 68 हजार 520 रुपये देण्याबाबत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यालयाला कळविले आहे.
हेही वाचा...
उमेदवारीअर्ज भरण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही
नगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित वेळेत अर्ज भरणे शक्य न झाल्यास, आज (ता. 30) दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक शाखेने निर्धारित केलेल्या परिसरात उपस्थित असलेल्या इच्छुकांना टोकन देण्यात येईल. टोकन दिलेल्या सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील. अर्ज भरण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्ह्यातील 757 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारीअर्ज सादर करण्याचा आज (ता. 30) शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत. मात्र, सर्व्हर सातत्याने डाऊन होत असल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज भरताना अडचणी आल्या. मुदतीत अर्ज भरता येईल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात असून, अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, की इच्छुकांनी 30 डिसेंबरपूर्वीच अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे. उद्या (ता.30) दुपारी तीन वाजेपूर्वी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरता न आल्यास निवडणूक शाखेने निर्धारित केलेल्या परिसरात उपस्थित इच्छुकांना टोकन देण्यात येईल. टोकन दिलेल्या सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील. त्यात कोणावरही अन्याय होणार नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास महाराष्ट्रभर अडचणी येत आहेत.

