Nagar tops in state in contact tracing | Sarkarnama

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये राज्यात नगर अव्वल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 एप्रिल 2020

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 13 मार्च रोजी आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वेगाने चक्रे फिरवून संचारबंदी लागू केली होती. या तत्पर नियोजनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखला गेला.

नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर जिल्ह्याने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्यांचा शोध घेऊन तातडीने त्यांची तपासणी करून उपाययोजना करण्यात नगर राज्यात आघाडीवर आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील सद्यःस्थितीची माहिती प्रशासनाला देण्यातही नगरने राज्यात आघाडी घेतली आहे.
 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केल्या जात आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चीनमधून आलेल्या तरुणाने स्वतः येऊन तपासणी करून घेतली होती. त्यानंतर याबाबत जिल्ह्यात आणखी सतर्कता बाळगत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचना देऊन पथके तयार केली. परदेशातून आलेल्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे साथरोग अधिकारी व पथके तयार करून ते हे काम करीत होते.
 
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 13 मार्च रोजी आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वेगाने चक्रे फिरवून संचारबंदी लागू केली होती. या तत्पर नियोजनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखला गेला. जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 जण कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असला, तरी 24 जण बरे होऊन परत गेले आहेत. सध्या 17 जण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या एकूण दीड हजार जणांचे स्राव घेऊन तपासणी करण्यात आली. त्यातील 1448 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 
कोरोना तपासणीसाठी संशयितांचे स्राव घेण्याचे कामकाज दैनंदिन सुरू असले, तरी त्यापेक्षा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात इतर तालुक्‍यांतून, परजिल्ह्यातून, परराज्यातून, तसेच परदेशातून किती जण आले, याची माहिती घेऊन या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. गावाकडे जाणाऱ्यांना शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये निवारा केंद्रांमध्ये थांबवून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील 27 निवारा केंद्रांमध्ये सुमारे दोन हजार जण आहेत. या सर्व नियोजनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात राखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगची पद्धत
ही तपासणी करत असताना एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याचे सुरवातीला समुपदेशन केले जाते. त्यात तो कोणाच्या संपर्कात आला होता, त्याने कोठे प्रवास केला, याची माहिती घेतली जाते. त्या आधारे आरोग्य यंत्रणा स्थानिक प्रशासनाला कळवून तातडीने त्या व्यक्तींचा शोध घेतला जातो. त्यांनाही जिल्हा रुग्णालयात आणले जाते. त्यांचेही समुपदेशन करून स्राव तपासणी होते. त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेतली जाते. त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांना जिल्हा रुग्णालयातच क्वारंटाईन केले जाते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तरी त्यांना चौदा दिवस आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवले जाते. नगरची कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगची ही पद्धत राज्यात क्रमांक एकची ठरल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून रोजचा आढावा
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रोज आढावा घेत आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असून, त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख