Nagar-Pune Wari fell heavily! District Sports Officer Kavita Navande in police custody | Sarkarnama

नगर-पुणे वारी पडली भारी ! जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 जून 2020

गव्हाणेवाडी चेक पोस्टवर नाकेबंदी केली होती. पुणे-नगर महामार्गावर श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार योगिता ढोले व अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी कविता नावंदे यांची गाडी अडविली. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

नगर : कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीच्या काळात नगर ते पुणे असा प्रवास केल्याच्या कारणाने जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. नावंदे यांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

नावंदे आज सकाळी त्यांच्या कारमधून नगरकडे येत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक पोस्टवर नाकेबंदी केली होती. पुणे-नगर महामार्गावर श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार योगिता ढोले व अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी नावंदे यांची गाडी अडविली. त्यांना ताब्यात घेवून पोलिसांच्या ताब्यात दिले. संचारबंदीच्या काळात जिल्हाबंदीचे आदेश असतानाही त्यांनी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नावंदे यांना बेलवंडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

त्यांचा रोजच होता प्रवास

पुणे ते नगर असा नावंदे यांचा विनापरवाना प्रवास सुरू होता. आज सकाळी त्यांना असाच प्रवास करताना पुण-नगर महामार्गावर पकडले आहे. परवान्याची चाैकशी केली असताना त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, बेलवंडी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले.

यापूर्वीही एका अधिकाऱ्यावर गुन्हा

लाॅकडाऊनच्या काळात अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे नियम तोडल्याचे उदाहरण यापूर्वीही जिल्ह्यात घडले आहे. संगमनेरच्या नायब तहसीलदारांनीही संगमनेर-पुणे प्रवास विनापरवाना केला होता. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता नावंदे यांच्यावरही गुन्हा दाखल होत आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात जिल्हाबंदीचे आदेश आहेत. तथापि, नागरिकांनी अशा पद्धतीने जिल्हाबंदी केल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार प्रशासन कारवाई करीत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शासनाच्या सेवेतील अधिकारीही अशा पद्धतीने नियम तोडताना आढळत असून, त्याबाबत प्रशासन अधिक कठोर पावले उचलत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाची पायमल्ली अधिकाऱ्यांकडून होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिक व अधिकारी यांना प्रशासन सारखीच कारवाई करीत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. किमान अधिकाऱ्यांनी तरी सरकारच्या नियम तोडू नये. तेच जर नियम तोडत असतील, तर सर्वसामान्य त्यांच्याकडून काय आदर्श घेणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख