Nagar journey from "Red" to "Orange" zone! | Sarkarnama

नगरचा प्रवास "रेड'मधून "ऑरेंज' झोनकडे!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 मे 2020

जिल्ह्याला ऑरेंज झोनमध्ये नेमक्‍या काय सुविधा मिळतात हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे. जिल्ह्याची वाटचाल ऑरेंज झोनकडे होत असल्याने नागरिकांची कोरोनासंदर्भातील अस्वस्थता कमी झाली आहे.

नगर : केंद्र सरकारने देशभरातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यात ऑरेंज झोनमध्ये नगरचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. बहुतांश सुविधा जिल्ह्यात सुरू होतील. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु या संदर्भातील आदेश काढण्याचा अधिकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आहे. राज्य सरकारकडून नियमावली आल्यानंतर लवकरच आदेश निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

मार्च महिन्याच्या सुरवातीला कोरोनाचा प्रसार सुरू झाला. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तातडीने सावध भूमिका घेतली. खबरदारीच्या उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या यंत्रणेला सूचना दिल्या. वेळोवेळी जनजागृती केली. स्वतः फिल्डवर उतरून लोकांना घराच्या बाहेर न पडण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे विनाकारण बाहेर पडणाऱ्यावरही कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक कोरोनाबाधित संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांना जास्तीत-जास्त ट्रेस करण्याच्या सूचना दिल्या. ज्या परिसरात कोरोनाचे जास्तीत-जास्त रुग्ण आढळले, तेथे संचारबंदी लागू करून परिसर हॉट स्पॉट घोषित केले. नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी पथके नेमून नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा घरबसल्या सुरू केल्या. आरोग्य यंत्रणेचा रोज आढावा घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी पुढील रणनीती ठरवली. कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन करून आरोग्य, पोलिस आदी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. जिल्ह्यातील 44 कोरोनाबाधितांपैकी 25 रुग्ण बरेही झाले. या एकजुटीच्या मेहनतीतून जिल्ह्याची वाटचाल खऱ्या अर्थाने कोरोनामुक्तीकडे होऊ लागली आहे. 
जिल्ह्याला ऑरेंज झोनमध्ये नेमक्‍या काय सुविधा मिळतात हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे. जिल्ह्याची वाटचाल ऑरेंज झोनकडे होत असल्याने नागरिकांची कोरोनासंदर्भातील अस्वस्थता कमी झाली आहे. जिल्ह्यातील जामखेड येथे बुधवारपर्यंत (ता. 6) व संगमनेर येथे गुरुवारपर्यंत (ता. 7) संचारबंदी राहणार आहे. जिल्ह्याच्या शेजारील पाच जिल्हे रेड झोनमध्ये आहे, तर बीड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. 

देशभरात रेड, ऑरेंज व ग्रीन झोनची यादी केंद्र सरकारने जाहीर केली. या यादीवर राज्य सरकार नियमावली तयार करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतील. त्यानंतर जिल्हाधिकारी याबाबतचे आदेश जारी करतील. 
- संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख