नगर जिल्हा उद्या ओलांडणार 5 हजार कोरोना रुग्णांचा टप्पा - Nagar district will cross the stage of 5000 corona patients tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्हा उद्या ओलांडणार 5 हजार कोरोना रुग्णांचा टप्पा

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 31 जुलै 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 973 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हा उद्या 5 हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणार आहे.

नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात 360 रुग्णांची वाढ झाली असून, 411 जणांना डिस्चार्ज मिळून ते घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या 3 हजार 360 झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 973 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हा उद्या 5 हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणार आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नवीन नियमावली जाहीर केली केली असून, 31 आॅगस्टपर्यंत पुन्हा अनेक बंधणे लादण्यात आले आहेत. जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजल्यापासून ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत या 24 तासात ३६० रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे.

आज आढळून सकाळी आलेल्या अहवालामध्ये नगर शहर १६, श्रीगोंदे १, नगर तालुका 1, श्रीरामपुर १, कोपरगाव ३ रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १६ रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर ७, नगर शहर ३ रुग्ण आढळून आले. गोविंदपुरा, यशवंत नगर १, शहर १, आगरकर मळा १, नेप्ती १, पारनेर तालुक्यात 5 रुग्ण आढळून आले होते. अँटीजेन चाचणीत आज १४३ जण बाधित आढळुन आले असून, त्यामध्ये संगमनेर २०, राहाता ५, पाथर्डी १६, नगर ग्रामीण ८, श्रीरामपुर २१,  कॅन्टोन्मेंट १७, नेवासे २६, कोपरगाव १५ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर शहर १२४, संगमनेर ५, राहाता १०, पाथर्डी ३, नगर तालुका ५, श्रीरामपूर ३, नेवासे १, श्रीगोंदा १, पारनेर १, अकोले २, राहुरी २, शेवगाव १ आणि कर्जत येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत 3 हजार 360 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 1 हजार 545 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात रुग्णसंख्या रोज वाढत आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढण्याचा वेग अधिक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात नियमांची अंमलबजावणी केली जात असून, रुग्ण संख्या कमी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख