नगर जिल्ह्यातील सेवा संस्था होणार ऑनलाईन ! शेतकऱ्यांना मिळणार या सुविधा - Nagar district service organization to be online! Farmers will get these facilities | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यातील सेवा संस्था होणार ऑनलाईन ! शेतकऱ्यांना मिळणार या सुविधा

मुरलीधर कराळे
मंगळवार, 16 मार्च 2021

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेचा मोठा आधार आहे. सहकारी बॅंक शेतकऱ्यांना त्यांच्या सात-बारा उताऱ्याप्रमाणे गरजेनुसार विविध स्वरुपांत कर्ज देते.

नगर : जिल्ह्यातील सर्व सेवा संस्थांचा कारभार आता ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी खास संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मायक्रो एटीएमही मिळणार आहे, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

शेळके म्हणाले, की ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेचा मोठा आधार आहे. सहकारी बॅंक शेतकऱ्यांना त्यांच्या सात-बारा उताऱ्याप्रमाणे गरजेनुसार विविध स्वरुपांत कर्ज देते. पिककर्ज, शेतीसाठी खेळते भांडवल, शेतीपूरक चारचाकीसाठी कर्ज, फार्म हाऊस, शेतीपुरक उद्योग अशा विविध स्वरुपात कर्ज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवायची गरज नाही. हे सर्व कर्ज सेवा संस्थांच्या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे सेवा संस्थांचा कारभार चांगला, पारदर्शी असणे आवश्यक असते. म्हणूनच बॅंकेच्या माध्यमातून खास प्रमाणील विकसित करण्यात आली आहे. 

हेही वाचा... मनाने राष्ट्रवादीतच होतो

शेतकऱ्यांना मिळणार मायक्रो एटीएम

नवीन प्रणालीनुसार शेतकऱ्यांना मायक्रो एटीएम मिळणार आहे. त्याद्वारे शेतकरी जिल्ह्यातून कुठूनही पैसे काढू शकतील, किंवा काही वस्तू थेट खरेदी करू शकतील. बॅंकांनाही एका क्लिकवर संबंधित शेतकऱ्यांचे खाते दिसणार आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन विविध अर्जही भरता येणार आहेत. त्यामुळे सेवा संस्थांचे कामेही सुलभ होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना तातडीने आपले काम करणे सोपे होईल.

बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना 3100 कोटी रुपयांचे कर्जवाटप झालेले आहे. तसेच शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी 3200 कोटी कर्ज देण्यात आले आहे. त्याची वसुली मार्चएण्डमुळे सुरू आहे. बॅंकेचा एनपीए शुन्य टक्के असतो. सर्व कर्ज वेळेत फेडण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील कर्जही मिळते. नव्याने तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. बॅंकेत ठेविदारांची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. या बॅंकेत व्यावसायिकांबरोबरच शेतकऱ्यांच्याही मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. नफा कमाविणे हा बॅंकेचा उद्देश नसून, शेतकऱ्यांची बॅंक शेतकऱ्यांच्याच हिताचा निर्णय घेते, असे शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा... वसुलीत भेदभाव नाही ः शेळके

गैरकारभाराला आळा बसेल

जिल्हा बॅंकेत 1400 सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात. आता ऑनलाईन कारभार होणार असल्याने गैरकारभाराला आळा बसणार आहे. सात-बारा बॅंकेतच मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे वाचणार आहेत. 

घरकुलांसाठीही मिळते कर्ज

शेतकऱ्यांसाठी घरकुल योजनेंतर्गंत फार्म हाऊससाठी कर्ज दिले जाते. तसेच शेतकऱ्यांना चार चाकीसाठीही कर्ज उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांना इतर बॅंकेच्या दारात जाण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वी दोन लाखांच्या आतील कर्ज माफ झालेले आहेत. त्यापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठीही सवलत मिळण्याची शक्यता असून, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून चार हजार 900 असे लाभार्थी आहेत. त्यांना या योजनांचा लाभ होईल, असेही शेळके यांनी सांगितले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख