संगमनेर : ""राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होऊन भाजपची सत्ता येणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य म्हणजे कवितेचे ध्रुवपद आहे. आपले कार्यकर्ते, आमदारांना मानसिक धीर देण्यासाठी, त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांना ते वारंवार उच्चारावे लागते. मात्र, महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत असून, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील,'' अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, ""रिपब्लिक वाहिनीने सातत्याने लोकशाहीविरोधात व चुकीच्या मार्गाने असत्य गोष्टी जनतेपर्यंत पोचविण्याचा व आर्थिक स्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला. पैसे देऊन बोगस टीआरपी वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांची सक्षमता सिद्ध करताना, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश केल्याने, सत्य जनतेसमोर आले. त्यामुळे त्यांचे काम निश्चित अभिनंदनीय आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई व्हायला हवी.''
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल मंत्री थोरात म्हणाले, ""खडसे यांना कॅमेऱ्यासमोर येऊ नये, अशी बंदी घालणे योग्य नाही. नाथाभाऊंसोबत 30 वर्षे काम केल्याने त्यांना आपण चांगले ओळखतो. त्यांच्या रूपाने एका सक्षम विरोधी पक्षनेत्याचे दर्शन झाले. त्यांच्या योगदानामुळेच भाजप व शिवसेनेचे सरकार आले होते. मात्र, अशा ज्येष्ठ नेत्याला दिलेली वागणूक अयोग्य असल्याने, त्यांना संताप येणे साहजिकच आहे.''
Edited By - Murlidhar Karale

