राजकीय कार्यकर्त्याच्या घरी मटण पार्टी, त्यात होता कोरोना पाॅझिटिव्ह, पुढे झाले असे... - Mutton party at the house of a political activist, in which there was a corona positive, it happened later ... | Politics Marathi News - Sarkarnama

राजकीय कार्यकर्त्याच्या घरी मटण पार्टी, त्यात होता कोरोना पाॅझिटिव्ह, पुढे झाले असे...

मुरलीधर कराळे
शनिवार, 18 जुलै 2020

एका राजकीय नेत्याने आयोजित केलेल्या मटण पार्टीला तो बाधित व्यक्तीही उपस्थित होता. अनेक नेत्यांनी या पार्टीत रस्सा अन हड्डीचा आस्वाद घेतला. त्यामुळे आता या सर्वांचीच धांदल उडाली आहे.

नगर : अकोले तालुक्यात सध्या एकच चर्चा रंगलीय. एक राजकीय बडा नेता आणि तालुक्यातील मोठा अधिकारी यांची एकत्रित मटण पार्टी झाली. त्यात सहभागी असलेल्या एका नेत्याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समजते. त्यामुळे रस्सा अन हड्डी खाणाऱ्या सर्वांचेच आता धाबे दणाणले आहेत.

अकोले येथे एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरी झालेल्या मटण पार्टीची चर्चा सोशल मीडियावर सध्या झळकत आहे. शुक्रवारी उशिरा आलेल्या कोरोना अहवालात अकोले तालुक्यातील ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये एका राजकिय पदाधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. स्वॅब दिल्यानंतर त्याने होम क्वारंटाईन होणे आवश्यक होते, मात्र ते सर्वत्र फिरला आहे. जवळील एका राजकीय नेत्याने आयोजित केलेल्या मटण पार्टीला तो बाधित व्यक्तीही उपस्थित होता. अनेक नेत्यांनी या पार्टीत रस्सा अन हड्डीचा आस्वाद घेतला. नंतर त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे समजल्याने आता या सर्वांचीच धांदल उडाली आहे. 

या घटनेचे पडसाड तालुक्यात पडू लागले असून, या प्रकरणाची चौकशीची मागणी होत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना कडक नियम लावून जर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येते, येथे मात्र अधिकारी, पदाधिकारी स्वतःहून होम क्वारंटाईन होत नाहीत, या प्रकाराची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संबंधित प्रकाराची माहिती काही लोकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कळविली असल्याचे समजते. याबाबत मात्र अद्यापही चिडीचूप वातावरण आहे.

संबंधित प्रकरणाची माहिती तालुक्यातील अनेक सरपंचांना झाली असून, सरपंच परिषदेच्या माध्यमातून ही माहिती थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याचे समजते. त्यामुळे तालुक्यातील बडे नेते होम क्वारंटाईन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्यांनी क्वारंटाईन व्हावे : सरपंच

तालुक्यातील काही नेते व कार्यकर्त्यांनी एका राजकीय नेत्याच्या मटण पार्टीला उपस्थित राहिल्याची माहिती समजली आहे. संबंधित नेते व अधिकारी आम्हाला कोरोनाबाबत मार्गदर्शन करताना लोकांची काळजी घेण्याचे आदेश देतात. पण ते मात्र स्वतः अशा पार्ट्यांना हजेरी लावून गावभर फिरतात. त्यांनीही क्वारंटाईन व्हावे. जिल्ह्यात संचारबंदी असताना अशा पद्धतीच्या पार्ट्या आयोजित करणे कितपत योग्य आहे, असे मत कुमशेतचे सरपंच सयाजी असवले यांनी `सरकारनामा` शी बोलताना व्यक्त केले.

तालुक्यातील काही नेते बेजबाबदारपणे वागतात : भांगरे

तालुक्यातील काही नेते बेजबाबदारपणे वागत आहेत. यापूर्वीही शिवथाळीचे उद्घाटन करताना काही अधिकारी व नेत्यांनी सोशल डिस्टन्सीचा नियम पाळला नाही. लोकांना सांगताना स्वतः तसे वागले पाहिजे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख