मुश्रीफ म्हणाले, कोरोना अद्याप संपला नाही, नियमांचे पालन करावेच लागेल - Mushrif said the corona is not over yet, the rules have to be followed | Politics Marathi News - Sarkarnama

मुश्रीफ म्हणाले, कोरोना अद्याप संपला नाही, नियमांचे पालन करावेच लागेल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत येथील पोलिस परेड मैदानावर झाले.

नगर : जिल्हा विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन नगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील. अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने सर्वांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत येथील पोलिस परेड मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे आदी उपस्थित होते. 

"विकेल ते पिकेल' या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एक हजार 400 ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. 

जिल्हा जिल्ह्यात सर्वाधिक "उन्नत' 

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर आहोत. आतापर्यंत 11 हजार 874 लाभार्थ्यांना 76 कोटी नऊ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले, तर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 348 कोटी 32 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. 

पोलिसांचा सन्मान 

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार काशिनाथ खराडे, राजेंद्र सुपेकर चालक सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलिस हवालदार शैलेश उपासनी, मन्सुर सय्यद, कैलास सोनार, पोलिस हवालदार अजित पवार यांचा, तर पोलीस निरीक्षक ज्योती गाडेकर यांचा उत्कृष्ट अपराधसिध्दीकरिता रुपये सात हजार व प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

कोरोना योद्धाच्या कुटूंबाला मदत 

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम (उत्तर विभाग) या विभागातील कर्मचारी ए. आर ठाणगे यांचा कर्तव्य बजावताना कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचे विमा कवच आणि कोविड योध्दा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख