निधी देताना मापात पाप केल्याचे मुश्रीफ यांनी केले कबूल

ग्रामविकास विभागाचा निधी देण्यासंदर्भात गेल्या पाच वर्षांत हे आम्ही भाजपकडूनच शिकलो आहोत. त्यांचेच अनुकरण आम्ही करत आहोत.
hasan mushrif
hasan mushrif

नगर : जिल्ह्यात निधी वाटपात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाआघाडीच्या लोकप्रतिनिधींना झुकते माप दिले, असा आरोप जिल्ह्यातून होत होता. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी तशा तक्रारीही केल्या होत्या. याबाबत आज पालकमंत्र्यांनी कबुली देत महाआघाडीच्या सरकारला झुकते माप दिले असल्याचे मान्य केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले,`` ग्रामविकास विभागाचा निधी देण्यासंदर्भात गेल्या पाच वर्षांत हे आम्ही भाजपकडूनच शिकलो आहोत. त्यांचेच अनुकरण आम्ही करत आहोत. भाजप सदस्यांनाही निधी दिला जाईल. मात्र, आघाडीच्या सदस्यांनाच झुकतं माप राहील.``
मुश्रीफ म्हणाले, ""कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यात जिल्हा प्रशासन, नागरिकांचे सहकार्य असल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र, मुंबई-पुण्याचे लोक आल्यामुळे धोका वाढला आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे 1397 कामे सुरू आहे. त्यावर 10 हजार 310 मजुरांची उपस्थिती आहे. जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणात आजमितीला 37 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पात 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापुढे आर्थिक बजेटमध्ये 25 टक्के हे आरोग्यावरच खर्च होणार आहे. जिल्ह्यातील 439 उद्योगांनी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेतली असून थोड्याच दिवसांत मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू होणार आहे.``

सफेद रेशनकार्ड धारकांनाही मिळणार लाभ 

मुश्रीफ म्हणाले, ""राज्य सरकार येत्या आठ दिवसांत महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत विविध आजारांसाठी लाभ मिळण्यासाठी नव्याने आदेश पारित करणार आहे. याचा लाभ मिळण्यासाठी युनाटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर टाय-अप करण्यात आले आहे. यात पांढरे रेशनकार्ड धारकांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे बारा-बलुतेदारांना गेल्या दोन महिन्यांपासून काहीही उत्पन्न नाही, त्यांनाही मदत देण्याची मागणी आम्ही केली आहे. ``

23 हजार परप्रांतियांना रवाना 

बिहार, राजस्थान, झारखंड, केरळ, उत्तरप्रदेश आदी राज्यातील 30 हजार परप्रांतियांपैकी 23 हजार 380 जणांना जिल्ह्यातून विशेष रेल्वेने रवाना करण्यात आले आहे. आजही तीन रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित मजुरांचाही घरवापसीचा मार्ग मोकळा होणार आहे, नगरमधील 16 हजार 170 नागरिक बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यातील 14 हजार जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले असून दोन ते तीन दिवसांत त्यांचीही घरी रवानगी करण्यात येणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

एक जूनला होईल जिल्हा कोरोनामुक्त 

नगरमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आहे. शुक्रवारी (ता. 5) आणखी काही जणांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. देवकृपेने जिल्ह्यात आता एक महिना एकही रुग्ण आढळला नाही, तर एक जूनला जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्‍वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com