श्रीरामपूरात मुरकुटे, ससाणे समर्थकांच्या हाती सतेची दोरी - Murkute, Sasane supporters in Srirampur | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरात मुरकुटे, ससाणे समर्थकांच्या हाती सतेची दोरी

गाैरव साळुंके
सोमवार, 18 जानेवारी 2021

माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ससाणे समर्थकांच्या हाती अनेक गावांची सत्ता आली. काही ठिकाणी आदिक समर्थकांचा झेंडा फडकला.

श्रीरामपूर : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये स्थानिक विचित्र युत्यामुळे अनेक ठिकाणी सत्तापालट घडुन आले आहे. प्रमुख नेत्यांनी निवडणुकांमध्ये सहभाग न घेतल्याने स्थानिक सोईनुसार विजयाचा गुलाला उधळला गेला. माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि उपनगराध्यक्ष करण ससाणे समर्थकांच्या हाती अनेक गावाची सत्ता आली. काही ठिकाणी अदिक आणि विखेपाटील समर्थकांचा झेंडा फडकला तर ठराविक गावांमध्ये विखेपाटील समर्थकांना पराभव पत्करावा लागला.

माजी सभापती नानासाहेब पवार, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यासह उपसभापती बाळासाहेब तोरणे, काँग्रेसचे अरुण नाईक यांच्या समर्थकांचा पराभव झाला. स्थानिक विचित्र युत्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तन घडले.

बेलापूर बुद्रूक येथे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, पढेगावात ससाणे समर्थक किशोर बनकर, टाकळीभान येथे काॅंग्रेसचे विष्णूपंत खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते कान्हा खंडागळे, शिवसेनेचे दादासाहेब कोकणे यांनी विरोधकांना चितपट केले.

टाकळीभान येथे सत्ताधारी गटाचे माजी सभापती नानासाहेब पवार यांना स्थानिक गटांनी टक्कर दिली. अनेक वर्षांनी चुरशीची लढत झाल्याने पवार यांना पराभव पत्काराला लागला. त्यामुळे माजी आमदार मुरकुटे, आमदार कानडे, अदिक आणि ससाणे समर्थकांच्या हाती सत्तेची चावी आली. बेलापूरात गावकरी विकास मंडळाला ११ जागा मिळाल्या, तर जनता विकास आघाडीला सहा जागांवर समाधान मानावे लागले. शरद नवले आणि अभिषेक खंडागळे यांच्या पॅनलचा विजय झाला. तर बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, काॅंग्रेसचे अरुण नाईक यांच्या समर्थकांचा पराभव झाला.

तसेच जनता विकास आघाडीचे रवी खटोड आणि भरत साळुंके यांचा सात जागांवर विजय झाला. बेलापूरात अनेक वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. पढेगावात किशोर बनकर यांच्या पॅनलचा विजय झाला असून, उपसभापती बाळासाहेब तोरणे यांना पराभव पत्करावा लागला. बनकर यांचे १३ उमेदवार विजयी झाले. वडाळा महादेव येथे विखे आणि अदिक समर्थकांना सत्ता कायम ठेवण्यात यश आले. ससाणे गटाचा पराभव झाल्यामुळे मुरकुटे, विखे आणि अदिक समर्थकांनी गुलाल घेतला. कारेगाव येथे माजी सभापती दीपक पटारे यांचे सर्वच उमेदवार विजय झाले असून, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे. मांलुजा बुद्रुक येथील एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मतदान झाले. पोस्टल मतदान बाद झाल्यामुळे सोडत चिठ्ठीद्वारे संगिता निवृत्ती बडाख यांचा विजय झाला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख