Murder of one in a farm dispute | Sarkarnama

चुलत्यांवरच संक्रांत ! शेतीच्या वादातून खुनाची ही दुसरी घटना

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 मे 2020

शेतीच्या बांधावरून होत असलेल्या वादाचे पर्यावसन अखेर भांडणातच होते. यासाठी सरसकट जमिनीच्या मोजणीचा पर्याय यापूर्वी अनेकदा झाला, परंतु त्यात पारदर्शकता आली नाही.

नगर : लाॅक डाऊन संपताच जिल्ह्यात गुन्हेगारी सत्र सुरू झाले आहे. काल पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा खून झाला. तशीच घटना संगमनेर तालुक्यातील काैठे कमळेश्वर येथेही घडली. तेथेही शेतीच्या वादातून चुलत्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना ठार करण्यात आले. लाॅक डाऊनच्या काळात पोलिसांनी रात्रंदिवस ड्युटी केली, आता गुन्हेगारीचा ससेमिरा त्यांच्या मागे सुरू होणार आहे. 

नगर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे अशा प्रकारचे गुन्हे कायम सुरू असतात. तथापि, शेतीच्या वादातून खून होण्याचे प्रमाणही कमी नाही. शेतीच्या बांधावरून होत असलेल्या वादाचे पर्यावसन अखेर भांडणातच होते. यासाठी सरसकट जमिनीच्या मोजणीचा पर्याय यापूर्वी अनेकदा झाला, परंतु त्यात पारदर्शकता आली नाही. त्याचाच परिणाम अशा पद्धतीने खुनामध्ये होत आहे. 

बांध कोरण्याचा वाद जीवावर
संगमनेर : शेताच्या बांधाच्या वादातून संतप्त झालेल्या पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे काल घडली. सतिश छबू यादव (वय 36) असे मयताचे नाव आहे. यातील प्रमुख आरोपी गोरख संपत यादव (रा. कौठे कमळेश्वर) याला संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 
कौठे कमळेश्वर येथे छबू माधव यादव यांची गावात 75 गुंठे जागा आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाऊ संपत माधव यादव यांची जमीन आहे. यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या आहेत. मात्र यांच्यात शेतीच्या बांधाहून किरकोळ कोराकोरीचा वाद सुरू आहे. याबाबत त्यांच्यात मागील आठवड्यात झालेल्या वादावर पोलिस ठाण्यात तोडगा निघाला होता. गोरख यादव याने चुलत्यास कुर्‍हाडीने घाव घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. रविवारी दुपारी चुलत्यास घरातून बाहेर बोलावून केलेल्या मारहाणीत डोक्यात कुऱ्हाडीचे घाव बसल्याने सतिश गंभीर जखमी झाला होता. त्याला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्णीच त्याचा मृत्यू झाला होता. या गटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गोरख यादव याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख