नगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली आहेत. संग्राम शेळके व मदन आढाव ही ती नावे आहेत. विशेष म्हणजे दिवंगत नेते अनिल राठोड यांनीच ही नावे यापूर्वी सादर करण्यात आली असल्याचे समजते. तीच नावे आज पुन्हा सादर करून शिवसेनेने (कै.) राठोड यांचा निर्णय मान्य केल्याचे मानले जाते.
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी उद्या (ता. 1) निवड होणार आहे. शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजप 1 असे एकूण 5 सदस्य निवडले जाणार आहेत. शिवसेनेकडून कोणाची नावे सादर होणार, याबाबत दोन गटांत मतभिंन्नता होती. एका गटाने तर थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यापूर्वी सादर केलेलीच नावे पुन्हा सादर केली असल्याचे समजते. त्यामुळे नवीन वादाचा प्रश्न येणार नाही, असेही मानले जाते.
भाजप व राष्ट्रवादी काॅंग्रेसने अद्याप नावे निश्चित केले नसून, ते लवकरच सादर करतील. उद्या होणाऱ्या सभेत पाच सदस्यांची नावे जाहीर होणार असून, राजकीय पक्षांनी बंद लिफाफ्यात पाठविलेल्या नावांची छाणऩी होणार आहे. त्यानंतर निवडी जाहीर होतील.
दरम्यान, महापालिकेत स्थायी समितीच्या निवडीवरून सुरू असलेले राजकारण शांत होते न होते तोच स्वीकृत नगरसेवकपदासाठीच्या राजकारणाचा खल सुरू झाला आहे.

