नगर : महापालिकेत सध्या भाजपचा महापाैर असला, तरी त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाठबळ आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. आज स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना ऐनवेळी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ते राष्ट्रवादीत गेले. अर्थात आगामी काळात स्थायी समितीची दोरीत आमदार जगताप यांच्याच हातात राहण्याची चिन्हे आहेत.
मनोज कोतकर भाजपमध्ये होते, तरी ते आमदार जगताप यांचेच कार्यकर्ते मानले जात होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी मनोज कोतकर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये होते. सत्तेच्या राजकारणात ते भाजपमध्ये गेले. तेथून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. असे असले, तरी ते जगताप यांचेच कार्यकर्ते म्हणून मानले जात होते.
सध्या स्थायी समितीचे 16 सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 5, शिवसेना 5, काॅंग्रेस 1 आणि बहुजन समाज पक्ष 1 असे बलाबल आहे. मनोज कोतकर हे राष्ट्रवादीत जाऊन ते आता राष्ट्रवादीचे हक्काचे 5 मते मिळविणार आहेत. तसेच भाजपला यापूर्वी राष्ट्रवादीनेच पाठिंबा दिला असल्याने साहजिकच भाजपचेही काही मते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच काॅंग्रेसचे 1 मत हक्काचे असणार आहे. या सर्व राजकारणात शिवसेना पुन्हा एकाकी पडणार आहे. शिवसेनेच्या वतीने नगरसेवक योगिराज गाडे यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे ते रात्रीतून राजकारणाचे कोणते डाव खेळू शकतात, हे मतदानातून कळणार आहे.

