नगर : महापालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आज मागे घेण्यात आले. त्यामुळे थकित मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसुली थंडावली होती. येत्या 15 तारखेपर्य़ंतच 75 टक्के शास्ती माफी असल्याने संप चिघळला असता, तर या सवलतीपासून अनेक नागरिक दुर्लक्षित राहिले असते.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले होते. मालमत्ताकरावरील शास्तीमाफीसाठी आधीच 15 दिवस वाढवून देण्यात आले होते. त्यातही शेवटच्या टप्प्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यास अडचणी येत होत्या. कर्मचाऱ्यांच्या अटी महापालिका प्रशासनाने मान्य केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
वेतन आयोगातील फरक मिळणार
महापालिका आयुक्तांबरोबर आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील फरक, सानुग्रह अनुदान आदी लाभ मिळणार आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन मागे घेतल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंद वायकर यांनी जाहीर केले.
प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. महापालिका प्रशासनासोबत काल दोन वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या. त्यानंतर आज पुन्हा महापालिका प्रशासन व संघटनेत सकारात्मक चर्चा झाली. महापालिका कामगारांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटीचे दीड कोटी रुपयांचे तीन हप्ते देणे, महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदानाचे थकीत प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यासाठी 30 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
विविध फरक मिळणार
वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेंतर्गत महापालिका कामगारांची 28 लाख रुपयांची सर्व थकीत बिले अदा करण्यात येणार आहेत. सहाव्या वेतन आयोगापोटी मृत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा 49 लाखांचा पगार फरक देणे, आश्वासित प्रगती योजनेंतर्गत 25 लाखांची बिले अदा करणे, फॅमिली भत्त्यापोटीचा 25 लाखांचा फरक संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये महागाई भत्त्याचा फरक अदा करणे, तसेच शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन व वेतनकामी 25 लाख रुपये देणे, आदी निर्णय बैठकीत झाले.
भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम वर्ग
कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमधील 79 लाख रुपये वर्ग करण्यात आले. त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. बैठकीला महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, कामगार अधिकारी दिगंबर कोंडा, संघटनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अयूब शेख, अकिल सय्यद, महादेव कोतकर, गुलाब गाडे, पाशा इमाम शेख, सतीश ताठे आदी उपस्थित होते.
दरम्यान, महापालिकेच्या या निर्णयाकडे महाराष्ट्रातील इतर महापालिकांचे लक्ष लागले होते.

