मुबंईतील पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची श्रीगोंद्यात आत्महत्या - Mumbai police officer's wife commits suicide in Shrigonda | Politics Marathi News - Sarkarnama

मुबंईतील पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची श्रीगोंद्यात आत्महत्या

संजय आ. काटे
बुधवार, 15 जुलै 2020

 मोटार घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून मयत अमिता हीचा सतत छळ सुरु होता. तिच्या पतीचे बाहेरील महिलेशी अनैतिक संबध होते, त्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे वडीलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीगोंदे : मुंबई येथे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) असणाऱ्या पांडुरंग ज्ञानदेव देवकाते यांच्या पत्नी अमिता (वय २७) यांनी काल मंगळवारी दुपारी शिटे सांगवी (ता. श्रीगोंदे) येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. यात रात्री उशिरा पोलिस अधिकारी पतीसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान समजलेल्या माहितीनुसार पतीच्या अनैतिक संबधाला वैतागलेल्या अमिता हिने आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे.

याबाबत मयत अमिता यांचे वडील कैलास दत्तात्रेय कोकरे राहणार पारोडी (ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. यात मुबंई येथे कार्यरत असणारे  सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते (पती), ज्ञानदेव देवकाते (सासरे), संध्या ज्ञानदेव देवकाते( सासू), गणेश ज्ञानदेव देवकाते (दीर) यांच्याविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली आहे. मोटार घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून मयत अमिता हीचा सतत छळ सुरु होता. तिच्या पतीचे बाहेरील महिलेशी अनैतिक संबध होते, त्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे वडीलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार पोलिस अधिकारी देवकाते यांचे दुसऱ्या महिलेशी असणाऱ्या नाजूक संबधामुळे पत्नी अमिता यांना देवकाते यांनी त्यांच्या गावी थिटेसांगवी येथे आणून सोडलेले होते. कोरोनाचे कारण देत त्यांना येथेच ठेवण्यात आले होते. मात्र त्यांना पतीसोबत जाण्याची इच्छा असतानाही पतीने त्यांना नेले नाही. त्यातच पतीचे एका महिलेशी असणाऱ्या अनैतिक संबधावरुन दोघांमध्ये भांडणे सुरु होती. गळफास घेवून जीवन संपविण्यापूर्वी अमिता यांनी पतीला व्हाॅटसअपद्वारे एक संदेश पाठवून अनैतिक संबध व इतर छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीत समजले आहे. मात्र त्याला पोलिसांनी अजून दुजोरा दिलेला नाही. 

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख