महावितरणच्या अधिकाऱ्यांची तनपुरेंकडून खरडपट्टी  - MSEDCL officials slapped by Tanpur | Politics Marathi News - Sarkarnama

महावितरणच्या अधिकाऱ्यांची तनपुरेंकडून खरडपट्टी 

संजय आ. काटे
रविवार, 31 जानेवारी 2021

श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांनी घनश्‍याम शेलार यांच्या माध्यमातून आज मंत्री तनपुरे यांच्याकडे महावितरणच्या तक्रारींचा पाढाच वाचला. यात मढेवडगाव, वडघुल येथील शेतकरी आघाडीवर होते.

श्रीगोंदे : उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे काल श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, महावितरणचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यातच शेतकऱ्यांनी तनपुरे यांच्याकडे महावितरणच्या गंभीर तक्रारी केल्यावर, त्यांचे निरसन करण्यासाठी अधिकारीच नसल्याने मंत्र्यांनी थेट महावितरणचे शहरातील कार्यालय गाठले. मंत्री येणार हा निरोपही गेला होता; मात्र कार्यालयाला टाळे होते. मंत्री आल्यावर घाईने कार्यालय उघडले; मात्र आतील दुर्गंधी आणि अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मंत्र्यांनी वरिष्ठांना फोनवरून चांगलेच झापले. 

श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांनी घनश्‍याम शेलार यांच्या माध्यमातून आज मंत्री तनपुरे यांच्याकडे महावितरणच्या तक्रारींचा पाढाच वाचला. यात मढेवडगाव, वडघुल येथील शेतकरी आघाडीवर होते. अनेक तक्रारी मांडल्यानंतर मंत्री तनपुरे यांनी, अधिकारी कोण आले आहेत, असे विचारताच, कोणीही उपस्थिती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, संयम दाखवीत मंत्री तनपुरे यांनी, "आपणच त्यांच्या कार्यालयात जाऊ,' असे म्हणत शहरातील कार्यालय गाठले. त्यापूर्वी, मंत्री येत आहेत, असा निरोप संबंधित अधिकाऱ्यांना दिला. मात्र, तनपुरे कार्यालयात पोचले तरी कार्यालय बंदच होते.

घाईघाईने एका अधिकाऱ्याने कार्यालय उघडले. तेथील खोलीतील दुर्गंधी आणि त्या कार्यालयाची अवस्था पाहून मंत्री चिडले. त्यातच एक टी-शर्ट घातलेला अधिकारी मंत्र्यांच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसला. त्यावर मंत्र्यांनी त्यांना चांगलेच झापले. 
अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी शुक्रवारी आढावा बैठक घेण्याची मागणी घनश्‍याम शेलार यांनी केली व ती मान्य करीत तनपुरे यांनी "सगळे रिपोर्टिंग करा,' असा आदेश अधिकाऱ्यांना दिला. या वेळी शेलार, ऋषिकेश गायकवाड, भाऊ मांडे, फुलसिंग मांडे, दीपक गायकवाड, दीपक गाडे, अमोल गाढवे, राम घोडके आदी उपस्थित होते. 

तोपर्यंत वीजजोड तोडू नका 

तनपुरे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून, शेतीपंपांची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ द्या. त्यासाठी सरकारने नवी योजना आणली आहे, ती लोकांना सांगण्यासाठी अगोदर वाड्या-वस्त्यांवर जा. शेतकऱ्यांच्याही अडचणी समजून घ्या, तोपर्यंत कुठलेही वीजजोड तोडू नका, असे बजावले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख