साईसंस्थानच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची खासदार विखेंनी ऐकली कैफियत - MP Vikhe heard the complaint of Sai Sansthan's hospital staff | Politics Marathi News - Sarkarnama

साईसंस्थानच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची खासदार विखेंनी ऐकली कैफियत

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 30 मार्च 2021

कोविड रूग्णालयाची पहाणी केल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यांना प्राधान्याने लसिकरण मोहीमेत सहभागी करून घ्या.

शिर्डी : राहाता तालुक्यात कोविड चाचण्या सर्वाधिक त्यामुळे रूग्णसंख्या अधिक आहे. साईसंस्थानच्या कोविड सेंटरला आपण आवश्यक ते सर्व सहकार्य करू. संस्थान प्रशासनाने अन्य दोन्ही रूग्णांलया ऐवजी कोविड रूग्णालयावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. कोविडची ही दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत वेगळी आहे. संसर्ग वेगाने फैलावतो, हे लक्षात घेऊन अधिक सतर्क रहा. अशा सूचना खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आज सरकारी व साईसंस्थानच्या यंत्रणेला दिल्या. 

कोविड रूग्णालयाची पहाणी केल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यांना प्राधान्याने लसिकरण मोहीमेत सहभागी करून घ्या, अशा सूचना सबंधितांना दिल्या. 

ईसंस्थानच्या धर्मशाळेत सरकारी यंत्रणा व संस्थानच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड रूग्णालयाला आज त्यांनी अचानक भेट दिली. तेथील त्रृटींबाबत तीव्र शब्दात नापंसती व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद म्हस्के, डाॅ. गोकूळ घोगरे, डाॅ. प्रितम वडगावे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व नगरसेवक अभय शेळके आदी या वेळी उपस्थीत होते.

डाॅ. विखे पाटील म्हणाले, की पूर्वी टप्या टप्याने रूग्णवाढ व्हायची, सध्या एकाच ठिकाणी शंभर रूग्ण सापडू शकतात. पूर्वी पाच ते सात दिवसानंतर रूग्णाला आराम पडायचा, आता पाच ते सात दिवसां नंतर त्रास सुरू होतो. संसर्गाचा फैलाव वेगाने होत असल्याने सतर्क रहाण्याची गरज आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना येथे प्रवेश देऊ नका अन्यथा फैलाव आणखी वाढेल.

साईसंस्थानने तातडी वगळता, अन्य दोन रूग्णालयाचे कामकाज कमी करून येथे कर्मचारी व डाॅक्टरांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यावर बगाटे यांनी त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगीतले.

आॅक्सिजन बेडची गरज भासू शकते

साईसंस्थान कोविड सेंटरमध्ये एकूण 274 खाटा आहेत. तेथे सध्या 109 रूग्ण दाखल आहे. मात्र आॅक्सिजन बेड शिल्लक नाहीत. यापुढे आणखी आॅक्सिजन बेडची गरज भासू शकते. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आजच्या बैठकीत वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता संस्थान धर्मशाळेच्या आणखी दोन इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. येत्या एक एप्रिलपासून रेमडीसिव्हीर इंजेक्शन सातशे रूपये या कमी केलेल्या किंमतीत मिळू शकेल, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद म्हस्के यांनी सांगितले.

शिर्डी कोविड रूग्णालयासाठी खासगी डाॅक्टरांना सेवा देण्याबाबत सूचना दिल्या. काही कर्मचारी देखील तिकडे पाठविले जातील. कोविड संसर्गाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे, असे राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्किय अधीक्षक डाॅ. गोकुळ घोगरे यांनी सांगितले.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख