शिर्डी : कोविडचा प्रकोप सुरू असताना, आपआपल्या मतदारसंघात वैद्यकीय मदतकार्यात अग्रेसर असलेल्या देशपातळीवरील पहिल्या 25 खासदारांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार राहुल गांधी यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर-2020मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली.
केंद्र सरकारच्या "गव्हर्न आय' यंत्रणेद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी देशभरातील खासदारांकडून याबाबतची माहिती ऑनलाइनद्वारे संकलीत करण्यात आली. याबाबत खासदार लोखंडे म्हणाले, की शिर्डी लोकसभा मतदारसंघात साडेसहा तालुके व 70 प्राथमिक आरोग्यकेंद्रे आहेत. ऑक्टोबरमध्ये कोविड ऐन भरात असताना, लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. या प्रतिकूल काळात सरकारी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व आशासेविका ही मंडळी कोरोनायोद्धा या नात्याने पुढे आली. या कोरोनायोद्ध्यांना कुठलीही कमतरता भासू नये, याकडे आपण जाणीवपूर्णक लक्ष दिले. प्रत्येक आरोग्य केंद्रास 200 पीपीई कीट, 400 मास्क व सॅनिटायझर पुरवले. त्यासाठी साई खेमानंद फाउंडेशनने मदत केली.
जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत दोन बैठका घेऊन मतदारसंघातील कोविड नियंत्रण मोहिमेचा आढावा घेतला. त्यातील त्रूटी दूर करण्यास प्राधान्य दिले. सर्व कोविड सेंटरना सातत्याने भेटी दिल्या. तालुका पातळीवर सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आढावा घेतला, असे लोखंडे म्हणाले.
कुठलाही गाजावाजा नाही
कुठलाही गाजावाजा न करता, खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोविडयोद्ध्यांना वैद्यकीय साधन, सामुग्री उपलब्ध करून दिली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील 25 खासदारांत त्यांचे नाव असल्याचा आनंद वाटतो, असे मत शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

