अनिल राठोड यांच्या अवसरी खुर्द गावात शोककळा, गाव बंद ठेवून श्रद्धांजली - Mourning in the village of Khurd on the occasion of Anil Rathore's death | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल राठोड यांच्या अवसरी खुर्द गावात शोककळा, गाव बंद ठेवून श्रद्धांजली

सुदाम बिडकर
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने त्यांचे मुळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द या गावी शोककळा पसरली आहे. त्यांच्या अनेक आठवणी ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. गावातील व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.

पारगाव (पुणे) : शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने त्यांचे मुळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील अवसरी खुर्द या गावी शोककळा पसरली आहे. त्यांच्या अनेक आठवणी ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. गावातील व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.

राजपूत समाजाचे राठोड कुटुंबिय मुळचे राजस्थानचे. अनिल राठोड यांचे पूर्वज आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे स्थायिक झाले होते. कालांतराने राठोड यांचे वडील व्यवसायानिमित्त नगरला स्थायिक झाले. त्यांच्या एका चुलत्याचे कुटुंब अवसरी खुर्द येथे आहे.

राठोड यांच्या वाड्यात चित्रपटाचे चित्रिकरण

अनिल राठोड यांचा जुना वाडा अवसरीच्या बाजारपेठेमध्ये खालचा वेशीला होता, त्यांची शेतीही अवसरी खुर्द मध्ये आहे. त्यांचा वाडा जुन्या पध्दतीचा देखणा होता. त्यामध्ये एका चित्रपटाचे ही चित्रीकरण झाले आहे. शिवसेना शाखेच्या अनेक बैठका याच वाड्यात होत होत्या. अनिल राठोड यांचा नगर शहरात व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांच्यातील कार्यकर्ता शांत बसला नाही. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे सुरू केले. हिंदू एकता आंदोलनाची शाखा नगरला सुरू झाल्यानंतर ते संघटनेचे काम करू लागले. शिवसेनेने त्यांच्यावर थेट नगर शहर प्रमुखपदाची जबाबदारी टाकली. तेव्हापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. ते शिवसेनेच्या तिकीटावर पाच वेळा आमदार म्हणुन निवडून आले होते. त्यांनी युती शासनाच्या काळात अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणुन काम पाहीले.

त्या वेळी अवसारी गावातून काढली मिरवणूक

ते नगर मध्ये जरी स्थायिक झाले असले, तरी त्यांची नाळ मुळ गाव असलेल्या अवसरी खुर्दशी जुळलेली होती. ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेला दरवर्षी ते आवुर्जुन उपस्थीत राहत. एखाद्या वर्षी यात्रेला येता नाही आले, तर ते कुटुंबासह मध्येच कधीतरी येऊन देवाचे दर्शन घेऊन जात. त्यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अवसरी खुर्द ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार करुन गावातुन मिरवणूक काढली होती.

भैरवनाथ मंदरात चांदीचा गाभारा करायचा होता

अनिल राठोड यांचे विश्वासू समजले जाणारे शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर म्हणाले, ``अवसरी खुर्द येथील भैरवनाथ मंदिरात चांदीचा गाभारा करण्याची भैय्यांची इच्छा होती. त्यासाठी ग्रामस्थांना नगर येथील एका मंदिरातील चांदीची कलाकृती पहाण्यासाठी बोलविले होते. नंतर गाभारा बनविणाऱ्या कलाकाराला घेऊन भैय्या स्वतः अवसरीला आले होते. राज्यमंत्री असताना अवसरी खुर्दमधील काही बंधारे मंजूर करण्यास मदत केली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन व अवसरीतील आयुर्वेदिक दवाखान्याचे उदघाटन भैय्यांच्या हस्ते झाले होते.``

राठोड कुटुंबाचे भूषण होते

अनिल भैया आमच्या राठोड परिवाराचे भुषण होते. आमच्या काैटुंबिक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहत. ते जरी नगरमध्ये स्थायिक झाले असले, तरी घरात एखादे शुभकार्य निघाल्यावर ते पहिली पत्रिका भैरवनाथांच्या चरणी ठेवण्यासाठी आठवणीने यायचे. भैय्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर आमच्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्हाला अत्यंसंस्काराला जाता न आल्याने भैयाचे अंतीम दर्शन घेता आले नाही, अशी खंत अनिल राठोड यांचे चुलत बंधू तसेच अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजू राठोड यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख