Mother of the patient at Nimon, wife positive | Sarkarnama

निमोण येथील रुग्णाची आई, पत्नी पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

नाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण मूळचा निमोण येथील आहे. त्याची आई व पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नगर : संगमनेर तालुक्‍यातील निमोण येथे आणखी दोन कोरोनाबाधितांची भर पडली. निमोण येथील दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी (ता. 19) निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आली होती. आज त्याची आई व पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 79 झाली आहे. 

नाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण मूळचा निमोण येथील आहे. त्याची आई व पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संगमनेर येथील हॉट स्पॉटची मुदत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने नुकतीच 1 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यातच आणखी दोन कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढणार आहे. 

अकोल्यातील पॉझिटिव्ह व्यक्तीची पुन्हा तपासणी 

लिंगदेव येथील व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. दहा दिवसांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्राव चाचणी खासगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, स्राव नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी या रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची पुन्हा स्राव चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. 

नगरमधील आणखी तिघे कोरोनामुक्त! 

जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत खऱ्या अर्थाने कोरोना चाचणीची सुरवात झाली. 15 व्यक्तींचे घशातील स्राव आज तपासण्यात आले. त्यातील दहा अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित नमुने पुन्हा तपासणार आहेत. दरम्यान, आज आणखी तीन जण कोरोनामुक्त झाले. त्यात नगर शहरातील सुभेदार गल्लीतील दोन, तर वंजार गल्लीतील एकाचा समावेश आहे. हे सर्व जण कंटेन्मेंट झोनमधील असल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 52 झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयातील कोविड-19 चाचणी

प्रयोगशाळेस काल शुक्रवारी "आयसीएमआर'कडून मान्यता मिळाली. त्यानंतर आवश्‍यक लॉगिन आयडीही प्राप्त झाला. मायक्रो बायोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू करण्यात आले. 

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना बूथ हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षातून दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 77 झाली असून, आठ जणांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख