जामखेड : तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.
चौंडी येथील निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पँनलने माजी मंत्री राम शिंदेच्या पॅनलचा पराभव केला आणि शिंदेच्या हातून ग्रामपंचायतीची सत्ताही काढून घेतली. चौंडी येथे झालेले परिवर्तन राम शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.
विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधील एक-एक सत्तास्थाने शिंदेंच्या हातून काढून घेतले. दोन्ही तालुक्यातील बहुतांशी संस्थामध्ये सत्ता परिवर्तन झाले. ग्रामपंचायत निवडणूकीतही अनेक ठिकाणी सत्तांतर झाले.
चौंडी ही राम शिंदेंची ग्रामपंचायत. येथे त्यांचा पॅनलचा दारुण पराभव झाला. त्यांच्या विरुद्ध जनसेवा पँनलचे सात उमेदवार निवडून आले.
विजयी उमेदवार : आशा सुनील उबाळे, कल्याण शिंदे, गणेश उबाळे, मालन शिंदे, रेणूका शिंदे, हनुमंत उदमले, सारीका सोणवणे यांनी जनसेवा पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि विजय मिळविला. तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला विलास जगदाळे व सुप्रिया जाधव या दोन जागावर समाधान मानावे लागले. माजी मंत्री शिंदे यांच्या पॅनलचा पराभव झाला.
हेही वाचा..
उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेला गॅस पडला अडगळीला
श्रीरामपूर : मागील वर्षभरात इंधनाचे दर झपाट्याने वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण वाढला आहे. इंधन दरवाढीमुळे इतर महागाई वेगाने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलसह दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचे दरही वाढल्याने नियमित गॅस भरणे कठीण बनले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गॅसऐवजी पुन्हा एकदा चुलीचा वापर केला जात आहे.
दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. मागील काही वर्षांत शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने, इंधन मागणीत मोठी वाढ झाली. इंधन दरवाढ झाल्याने मालवाहतुकीचे भाडेही महागले आहे. परिणामी, बाजारातील विविध वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत केवळ 100 रुपये शुल्क भरून शेकडो गृहिणीसाठी घरोघरी गॅस सिलिंडर वाटप केले. धुरमुक्त व चूलमुक्त स्वयपांक करीत असताना, गॅसचे दर वाढल्यामुळे अनेकांनी पुन्हा चुलीचा वापर सुरू केला आहे. गॅसच्या किंमती वाढल्यामुळे, तसेच गॅससाठी मिळणारे अनुदानही चार महिन्यांपासून बंद पडल्याने मोफत मिळालेला गॅस अडगळीत पडल्याचे दिसते. महागाई वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरील स्वयंपाक करण्यात येत आहे. वाढत्या महागाईमुळे घरगुती इंधन वापरणे कठीण बनले आहे. तसेच वाहन चालविणे खर्चिक झाले असून, पेट्रोल महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. महागाईचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि मजूरांना बसत असल्याचे सांगितले जाते. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Edited By - Murlidhar Karale

